पुतळा परिसरात 144 कलम लागू; शहरात प्रचंड बंदोबस्त; शिवभक्तांची गर्दी
आष्टा / वार्ताहर
आष्टा शहर गाढ झोपेत असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवप्रेमींना सुखद धक्का दिला. एका रात्रीत शिवछत्रपतींचा बारा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकात उभा केला. तसेच आकर्षक चबुतराही उभारला. गनिमी काव्याने कार्यकर्त्यांनी ही मोहीम फत्ते केली. आणि आष्टा शहरातील शिवभक्तांचे स्वप्न साकार झाले.
मंगळवारी सकाळी हजारो शिवभक्तांनी शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. प्रवीणभाऊ माने यांच्या नेतृत्वाखाली पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांनी एका रात्रीत पुतळा उभारल्याची चर्चा सुरु आहे. जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. मात्र सायंकाळी पाचनंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला. दरम्यान, पोलिसांनी शिवाजी चौकात 144 कलम लागू केले.
आष्टा शहरात शिवरायांच्या पुतळ्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. 25 डिसेंबर रोजी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी दत्त मंदिर परिसरात शिवरायांचा पुतळा आणि मंदिर उभा केले होते. त्यानंतर जागा हस्तांतरासाठी पुतळा संघर्ष समितीने धरणे आंदोलन धरले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
दरम्यान हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच सोमवारी मध्यरात्री भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणभाऊ माने आणि शिवभक्तांनी निशिकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवरायांचा बारा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा येथील शिवाजी चौकात रातोरात बसवला. शिवाजी चौकात मोठा कट्टा आहे. या कट्टय़ावर चार ते पाच फूट उंचीचा आकर्षक चबुतरा करून या चबुतऱयावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे. शिवरायांना हार घालण्यासाठी लोखंडी जीनाही बसविला आहे. तसेच आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती. शिवरायांचा जयघोष सुरू होता.
पोलीस प्रशासनाच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर मोठा फौज फाटा याठिकाणी आणण्यात आला. बॅरेगेट्स लावून या चौकाची सर्व बाजूंनी नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिसांनी चौकात मोठा बंदोबस्त ठेवला होता. सकाळी नऊच्या सुमारास इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशिकांतदादा पाटील शिवाजी चौकात दाखल झाले. शेकडोंच्या संख्येने शिवभक्त आणि कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित झाले. निशिकांतदादा पाटील यांनी पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन यांच्याशी चर्चा केली. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.
निशिकांतदादा पाटील यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱयांशी चर्चा करून संबंधित जागा तत्काळ हस्तांतरित करण्याची मागणी केली. प्रवीणभाऊ माने यांनी इंचभर ही जागा पुतळा हलवणार नाही. पुतळा हलविल्यास शेकडो शिवभक्त आत्मदहन करतील, असा इशारा दिला. तसेच संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करणार असल्याची घोषणा केली. या महाआरतीस शिवभक्तांनी मोठय़ा संख्येने हजर राहावे, असे आवाहन केले. सायंकाळी पाचपर्यंत पुतळा परिसरात वातावरण शांत तसेच शिवमय झाले होते. मात्र त्यानंतर पोलीस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली. पुतळा परिसरात बंदोबस्त वाढवला. भाजपाचे कार्यकर्ते तसेच शिवभक्तांना पुतळा परिसरातून बाजूला केले. यामुळे तणाव अधिकच वाढला. संध्याकाळी पोलिसांनी 144 कलम पुतळा परिसरात लागू करण्यात आले आहे.