सांगली :
‘हरित संगम’ उपक्रमातून सांगली मिरज-कुपवाड देशातील शुद्ध हवा देणारे हिरवे शहर बनणार असल्याची माहिती आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. त्यानुसार मनपाकडून यंदा २५ हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच तीन वर्षांत एक लाख झाडांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छ हवेसाठी हवामान निर्देशांक ३० पेक्षा कमी ठेवणे, ४० टक्के हरित क्षेत्र आणि ८५ टक्के झाडे जगवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट यात ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट सन २०२५ ते २८ यासाठी निश्चित केले आहे. २०२५-२६ मधील लागवड २५ हजार झाडे, तीन वर्षांतील एकूण लक्ष्य एक लाख झाडे, हरित आच्छादन वाढवण्याचे लक्ष्य ४० टक्के आहे. शहर परिसर हवामान निर्देशांक ३० पेक्षा कमी ठेवणे. टिकाव प्रमाण ८५ टक्केपेक्षा अधिक असेल. डिजिटल टॅकिंग, कोड प्रत्येक झाडासाठी लावण्यात येणार आहे. विशेष उपक्रमात ग्रीन संडे, मियावाकी वन, ऑक्सिजन पार्क असे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांतील हरित क्षेत्र सतत घटत चालले आहे. हवामान निर्देशांक सुद्धा घसरत चालला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने हरित संगम या नावाने एक व्यापक, शाश्वत आणि तांत्रिक दृष्टिकोन असलेला वृक्ष लागवड व संगोपन उपक्रम सुरू केला आहे. शहरातील हरित क्षेत्रात भरीव वाढ करणे, हवामान शुद्धता सुधारणे, प्रदूषण पातळी कमी करणे. नागरिकांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत दीर्घकालीन बांधिलकी निर्माण करणे. पर्यावरणपूरक, तापमान विरोधक व सौंदर्यदृष्टीने प्रभावी झाडांची वाढ करणे. सरकारी, खासगी आणि नागरी क्षेत्रांमध्ये सहभाग आणि जबाबदारीची वाटणी करणे असे ठरवण्यात आले आहे.
- उपक्रमाची वैशिष्ट्ये
२५ हजार झाडे, २०२५-२६ मध्येः चारही झोनमध्ये आवश्यकता लक्षात घेऊन नियोजनबद्ध लागवड, स्थानिक हवामानास अनुकूल, कमी पाण्यात वाढणाऱ्या व सावली/प्रदूषणरोधी जातींना प्राधान्य कोड आधारित टॅकिंग, प्रत्येक झाडाची अचूक लोकेशन, नोंदणी व फॉलोअप, ट्रॅकिंग करण्यासाठी मोबाईल, वेब आधारित सिस्टिम
- झाडांचे संगोपन हे मुख्य ध्येय
“लावणे नाही, जगवणे” ही खरी जबाबदारी, टँकर/ड्रीपद्वारे पाणीपुरवठा, खत, झोननिहाय ‘नोडल गार्डनर’ यंत्रणा जनसहभाग वाढवण्यासाठी अभिनव उपक्रम, एक कुटुंब, एक झाड, शाळा कॉलेजमधील ग्रीन क्लब्स, प्रत्येक महिन्याचा ग्रीन संडे, खासगी कंपन्यांचा सीएसआर सहभाग, सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी संघटनांची भागीदारी, विशेष घटक, मियावाकी वनतंत्रज्ञान वापरून शहराच्या मध्यवर्ती वस्तीभागात जलद वाढणारे जंगल तयार करणे, ररत्याकडेला, नदी/नाल्यांच्या काठावर व उड्डाणपूलांखाली शोभिवंत वृक्षसंगती, प्रत्येक विभागात ऑक्सिजन पार्क, देवराई संरकृतीचे जतन करणारी ठिकाणे, झोननिहाय उद्दिष्टे व टॅकिंग, डिजिटल डॅशबोर्डवर माहिती प्रदर्शित, दर सहा महिन्यांनी स्वतंत्र संस्थांद्वारे ऑडिट, वार्षिक प्रगती अहवाल प्रसिद्ध करणे.
सांगली, मिरज, कुपवाडचा संगम आणि त्याचा निसर्गाशी होणारा हरित संगम ही यामागची मुख्य संकल्पना आहे. आज संपूर्ण जगापुढे हवामान बदल, तापमान वाढ यामुळे अवघे मानवी अस्तित्व पणाला लागले आहे. सर्वत्र यासाठी प्रयत्न चालू आहेत. सांगली शहरात झाडांचे प्रमाण प्रति माणशी जवळपास दोन आहे. पण येत्या तीन वर्षात ते तीनपेक्षा जास्त करण्याचा आमचा मनोदय आहे. लोकसहभाग, नवीनतम हरित प्रयोग यातून आम्ही ते साध्य करण्याचा निश्चय केला आहे. या शहरातील नागरिक त्याला साथ देतील असा माझा विश्वास आहे.
– सत्यम गांधी आयुक्त








