सांगली :
उन्हाळी सुट्टयामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वेच्या मध्य व दक्षिण पश्चिम विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या तीन नव्या सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचे सांगली रेल्वेस्टेशनवर भारतीय जनता पार्टीच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते रामनवमीच्या मुहूर्तावर हिरवा झेंडा दाखवून या गाड्या पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्या. कोल्हापूर ते कटीहार, बेंगळूर ते भगतकीकोटी व बेंगळूर ते मुंबई या तीन नव्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे.
कोल्हापूर ते कटीहार, बेंगळूर ते भगतकीकोटी व बेंगळूर ते मुंबई या उन्हाळी स्पेशल गाड्यांना सांगलीत थांबा मिळण्याबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी भाजप महाराष्ट्र रेल्वे प्रकोष्ठचे अध्यक्ष कैलास वर्मा यांच्यामार्फत मागणी केली होती. त्याची दखल घेत रेल्वे बोर्डाच्यावतीने या तिन्हीही गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा दिला आहे. येता जाता या गाड्या सांगलीला थांबणार आहेत. रविवारी मोठ्या जल्लोषात तीनपैकी कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनल ते कटीहार या पहिल्या गाडीचे सांगली रेल्वेस्टेशनवर सकाळी पावणेआकराच्या सुमारास स्वागत करण्यात आले.
आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखविला. यावेळी महिला कार्यकर्त्यांच्या हस्ते गाडीचे दोन्ही लोको पायलट यांचा सत्कार करण्यात आला. रविवारी रामनवमीचा दिवस असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणांनी स्टेशनचा परिसर दणाणून सोडला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, गितांजली ढोपे पाटील, उर्मिला बेलवलकर, केदार खाडीलकर, अविनाश मोहिते, सुजितकुमार काटे, अश्विनी तारळेकर, रूपाली अडसूळे, उदय बेलवलकर, उदय मुळे, अमोल कणसे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. अन्य दोन गाड्यांचे भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
- गाड्या नियमित करण्यासाठी प्रयत्नशील– आमदार गाडगीळ
सध्याच्या कोल्हापूर ते कटीहार, बेंगळूर ते भगतकीकोटी व बेंगळुरु सर विश्वेश्वरैया टर्मिनल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या तिन्ही गाड्या उन्हाळी स्पेशल म्हणून धावणार आहेत. यामुळे बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व कर्नाटकाकडे जाण्यासाठी नव्या गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. गाड्या कायम करण्यासाठी आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.








