ठिबकचे अनुदान रखडल्याने शेतकरी आक्रमक
देवराष्ट्रे/वार्ताहर
कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे ठिबकचे अनुदान अधिकाऱ्याने ऑनलाईन चुकीची माहिती भरल्यामुळे रखडले आहे याप्रकरणी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम यांना निवेदन देऊन त्वरित रखडलेले अनुदान जमा करावे व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
अधिक वाचा : अधिश बंगल्याबाबत नारायण राणेंची याचिका न्यायालयाने फेटाळली
कडेगाव तालुक्यातील शेतीचे ठिबकचे अनुदान अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन चुकांमुळे रखडले आहे याप्रकरणी शेतकऱ्यांनी वारंवार तोंडी मागणी करून देखील अधिकाऱ्यांनी ऑनलाइन दुरुस्त्या केलेल्या नाहीत तसेच शेतकऱ्यांना तुमच्या फाईल मंत्रालयात अडकल्या आहेत. सिस्टीम मध्ये प्रॉब्लेम आहे अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी बाळकृष्ण कदम यांना निवेदन देऊन चुका केलेल्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी व शेतकऱ्यांचे अनुदान त्वरित जमा करावे. अनुदान आठ दिवसात जमा न झाल्यास कृषी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा संदेश जाधव, विनायक जाधव, किरण जाधव सह अन्य शेतकऱ्यांनी दिला आहे.