विटा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
सांगली / प्रतिनिधी
सांगलीतील विटामध्ये चक्क तहसीलदारांच्या विरोधात साखर चोरीचा तक्रार अर्ज विटा पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून याबाबत तक्रार देण्यात आली आहे. नागेवाडीच्या यशवंत साखर कारखान्यातील साखर लिलाव प्रकरणी जिल्हा बँकेने ही तक्रार दाखल केली असून याबाबत विटा तहसीलदारांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पोलीसांनी बजावली आहे.
विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याविरोधात साखर चोरीचा गुन्हा दाखल करण्याबाबत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून विटा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या ताब्यात असणारी साखर कारखान्याची साखर बँकेच्या परस्पर गोडावनची कुलूप तोडून विक्री केल्याचा आरोप करत जिल्हा बँकेने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत विटा पोलिसांच्याकडून तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना याबाबतीत पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना बजवण्यात आलेल्या नोटिसीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. याबाबत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत उस बिलासाठी गेली एक वर्ष संघर्ष सुरू आहे. या संघर्षाची दखल घेवून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर आणि मालमत्ता लिलावाचा म्हणजेच आरआरसी कारवाई करून 15 टक्के व्याजाने उस बिले भागविण्याचा आदेश सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विटा व तासगाव तहसीलदारांच्या कडे दिली. त्यानुसार विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी 50 हजार पोत्याचा लिलाव जाहीर केला, 4 मार्च रोजी लिलाव पार पडल होता,ज्यामध्ये तीन व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला, कराडच्या व्यापाऱ्याला लिलाव देण्यात आला त्यापोटी त्यांनी 15 कोटी 70 लाख रुपये तहसीलदारांच्या खात्यावर वर्ग केले, त्यानंतर तहसीलदार शेळके यांनी सदरची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केली.ही सर्व प्रक्रिया शासकीय नियमाने आणि पूर्ण पारदर्शी पद्धतीने पार पडली आहे.
दुसरया बाजूला जिल्हा बँकेचे सदरच्या कारखान्याच्या साखरेवर तारण कर्ज आहे.ही वस्तुस्थिती आहे.मात्र आर.आर. सी कारवाई झाल्याने पहिला हक्क साखर विभागाचा आहे,त्यामुळे जिल्हा बँकेने तहसीलदारांच्यावर साखर चोरीचा गुन्हा दाखल करण्याची गरज नव्हती. मात्र चुकीच्या पदधतीने बँकेचा पवित्रा सुरू आहे.त्याला स्वाभिमानीच्या तीव्र विरोध आहे.सर्व शेतकरी आणि संघटना ठाम पणाने तहसीलदारांच्या पाठीशी राहील,आणि त्वरित जिल्हा बँकेने दाखल केलेला अर्ज मागे घ्यावा अन्यथा,प्रसंगी बँके विरोधात मोर्चा काढू,असा इशारा खराडे यांनी दिला आहे.