रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू
हातनूर / वार्ताहर
विसापूर ता तासगाव येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली आरफळ कॅनॉल मध्ये पडल्या. यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडला तर दुसरी अद्याप बेपत्ता आहे. ही दुर्दैवी घटना आज दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान बेरडकी मळ्या जवळ घडली. आरोही विक्रम गुजले (वय-४) रा. बांबवडे असे बुडालेल्या मुलीचे नाव आहे तर दुर्गा कुमार मदने वय-१८ रा.वासुंबे अद्याप बेपत्ता आहे. या घटनेची माहिती पोलीस पाटील संदीप पाटील यांनी तासगाव पोलिसात दिली.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील जुन्या बामणी रोडजवळ बेरडकी मळ्यात पद्मा कुमार मदने रा.वासुंबे राहतात. आज दुपारी अडीजच्या दरम्यान त्यांच्या कुटुंबातील आरोही व दुर्गा या जवळच असणाऱ्या आरफळ कॅनॉलमध्ये कपडे धुण्यासाठी उतरल्या होत्या. कपडे धुताना आरोही कॅनाल मध्ये पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने उडी मारली. मात्र दुर्देवाने दोघी बुडाल्या. पैकी आरोही काही किलोमीटर अंतरावर सापडली तर दुर्गा अद्याप बेपत्ता आहे. जवळ शेतात काम करत असलेल्या माणसांनी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र ती वाचू शकली नाही.
दरम्यान पोलीस पाटील संदीप पाटील व गावातील चाळीस ते पन्नास तरुणांनी गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतर आरफळ मध्ये शोध मोहीम घेतली मात्र अद्याप दुर्गा सापडली नाही. आरफळचा कॅनॉल दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे दुसऱ्या मुलीला शोधून काढणे कठीण होऊन बसले आहे. सायंकाळी उशिरा साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. केराम व पोलीस उपनिरीक्षक श्री. तारडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.घटना घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. तपास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. पोलीस नाईक विजय घस्ते व पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय जाधव तपास करत आहेत.









