महाविकास आघाडीतील असंतोष, खदखद उफाळून आली; विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसणार
इस्लामपूर / प्रतिनिधी
माझी उमेदवारी ही अनपेक्षित होती. भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सामान्य युवकाला संधी दिली आणि विजयी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या विजयाचे श्रेय जाते. त्यांनी आखलेल्या रणनितीमुळे मी विजयी झालो. महाविकास आघाडीतील गेल्या दोन वर्षातील असंतोष व खदखद उफाळून आहे. याचा फटका आगामी विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिसून येईल. विधानपरिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असते, यामुळे भाजपच्या जितके उमेदवार उभे राहतील, तेवढे निवडून येतील, असा. विश्वास खा. धनंजय महाडीक यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला.
यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व भाजपा युमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल महाडीक, महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यसमिती सदस्य सम्राट महाडीक, सी.बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. खा. महाडीक पुढे म्हणाले, माजी खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीवरून बराच गदारोळ झाला. मात्र संभाजीराजेंची भूमिका अपक्ष लढण्याची होती. त्यामुळे पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला नाही, संभाजीराजांनी अतिशय चांगल काम केले त्यामुळे भविष्यात त्यांना चांगली संधी मिळू शकते, असा विश्वास आहे.
खा.महाडीक पुढे म्हणाले, माझ्या विजयात भाजपच्या सर्व नेत्यांचे योगदान आहे. यामध्ये प्रविण दरेकर, अशिष शेलार, प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे,गिरीष महाजन यांच्यासह अनेक नेत्यांचे योगदान आहे. तसेच माझ्या कुटुंबाचे ही मोलाचे योगदान आहे. महाडीक परिवाराने तीन, चार जिल्हयात आपले साम्राज्य उभा केले आहे. माझे वडील भिमराव महाडीक यांच्यासह त्यांच्या सर्व भावांची शिकवण व शिदोरी माझ्या बरोबर आहे. गोरगरीबांना न्याय देण्याचे काम महाडीक परिवाराने केले आहे. भाजपचे ऋण हे न फिटण्यासारखे आहे. पक्षाने मला आता मोठी जबाबदारी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत भाजपची ताकद दाखवू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकामध्ये भाजपाच्या चिन्हावर लढण्याची तयारी आहे.
राहूल व सम्राटची मोलाची साथ
माझ्या विजयात महाडीक परिवाराचे योगदान आहे. विशेषता राहूल महाडीक व सम्राट महाडीक यांचे आहे. हे दोघे गेली १५ दिवस झाले मुंबईत तळ ठोकून होते. सर्व आमदारांना भेटणे, त्यांना विनंती करण्याचे काम या दोघांनी केले आहे. त्यामुळे त्यांचा मला सार्थ अभिमान आहे, असे खा. महाडीक यांनी सांगितले.