मिरज-मालगांव रस्त्यावरील इंदिरानगर फाटा येथे अपघात, दोघे जखमी
प्रतिनिधी/मिरज
दोन भरधाव दुचाकींची समोरासमोरुन धडक होऊन झालेल्या अपघातात एका मेडिकल चालकासह दोघेजण जागीच ठार झाले. निशिकांत तमन्ना घटनट्टी (वय 32 रा. जिलेबी चौक, ब्राम्हणपूरी, मिरज) आणि नितीन राजेंद्र औरसंगे (वय 26, रा. गणेश कॉलनी, मालगांव) असे अपघातात मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मिरज-मालगांव रस्त्यावरील इंदिरानगर फाटा येथे हा अपघात झाला. याप्रकरणी मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, निशिकांत घटनट्टी हे मेडिकल व्यवसायिक असून, मालगांव येथे श्री मेडिकल नावाने त्याचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे ते मेडिकल बंद करुन मंगळवारी रात्री ते होंडा मोटारसायकल (एमएच-10-डीआर-2792) वरुन मालगांवकडून मिरजेकडे येत होते. ते मालगांव रस्त्यावरील इंदिरानगर फाटा येथे निरंकारी मेडीकलजवळ आल्यानंतर समोरुन नितीन राजेंद्र औरसंगे हा डिलक्स मोटारसायकल (एमएच-10-बीएच-2901) वरुन ट्रीपल सिट आला. औरसंगे आणि घटनट्टी यांच्या दोन्ही मोटारसायकली भरधाव वेगात असल्याने दोघांचीही समोरासमोर धडक झाली. या अपघातात निशिकांत घटनट्टी आणि नितीन औरसंगे हे दोघे गंभीर जखमी होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर औरसंगे याच्या मोटारसायकलीवर पाठीमागे बसलेले एहमत दिलावर सुभेदार, मुजम्मील इसाक मुलाणी हे दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.