प्रतिनिधी / मिरज
तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात माधवनगर येथील तिघे तरुण वाहून गेल्याची घटना घडली. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे यातील एका तरुणाला वाचविण्यात यश आले आहे. मात्र, अन्य दोघे तरुण वाहून गेले आहेत. सलमान शौकत तांबोळी (वय 21,) आणि आरमान हुसेन मुलाणी (वय 16) अशी वाहून गेलेल्यांची नांवे आहेत. तर नदीम फिरोज मुलाणी (वय 18) असे वाचविण्यात आलेल्या तरुणाचे नांव आहे. आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांकडून म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, माधवनगर येथे राहणारे संबंधीत तिघे तरुण हे छोटा हत्ती टेंपो चालक आहेत. मंगळवारी दुपारी एक भाडे घेऊन ते बेडग येथे आले होते. भाडे सोडून झाल्यानंतर सदर तिघेजण बेडग येथील म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने सदर तिघेही तरुण वाहून गेले. तरुण पाण्यात बुडल्याचे दिसताच काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे यातील नदीम मुलाणी नामक तरुणाला वाचविण्यात यश आले. मात्र, सलमान शौकत तांबोळी, आणि आरमान हुसेन मुलाणी हे दोघे तरुण वाहून गेल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. वाचविलेल्या तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिरज ग्रामीण पोलीस आणि आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांकडून पाण्यात बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे.