मनपा प्रशासनाचा अजब कारभार; अपहाराचा संशय; रस्ता दुभाजकाचा प्रश्न ऐरणीवर; चौकशी करून कारवाई करण्याची नगरसेवक शेडजी मोहीते यांची मागणी
कुपवाड प्रतिनिधी
कुपवाडमधील सुतगिरणी ते जकात नाक्यापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी मंजूर पावनेदोन कोटीच्या निधीतून ठरावाप्रमाणे संबंधित ठेकेदाराने रस्ता दुभाजकाचे काम केलेच नाही, तरीही मनपा प्रशासनाने ठेकेदाराशी संगनमत करून बिल दिले आहे. यात कुपवाडकरांची फसवणूक झाली असून ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात अपहार झाल्याचा आरोप करून याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कड़क कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कुपवाडचे नगरसेवक शेडजी मोहिते यांनी केली आहे. यासंबंधी शेडजी मोहिते यांनी गुरुवारी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
दरम्यान, या निमित्ताने कुपवाडच्या मुख्य रस्त्यावरील रस्ता दुभाजकाचा प्रश्न ऐरणीवर आला असुन अपूर्ण कामाचे पैसे ठेकेदाराला दिल्याने मनपा प्रशासनाचा अजब कारभार पहावयास मिळत आहे. संबंधित भ्रष्ट ठेकेदाराकडून दुभाजकाची बळकवलेली रक्कम वसूल करून त्याच्याकडूनच दुभाजक करण्यात यावे, दुभाजकाचे काम पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा मोहिते यांनी दिला आहे.
निवेदनात म्हंटले की, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत प्राप्त 100 कोटीच्या निधीतून कुपवाडमधील भारत सुतगिरणी ते जकात नाका या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी अंदाजीत 1 कोटी 70 लाखाच्या निधीला मंजूरी देण्यात आली होती. सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अंदाज पत्रकातील रस्त्याच्या मध्यभागी असणाया रस्ता दुभाजकाचे काम अद्यापही प्रलंबित आहे. तरीही संबंधित अधिकारी व मक्तेदार यांनी संगनमत करून अंदाजपत्रकातील कामे पूर्ण झाल्याचे भासवून मनपा प्रशासनाने मक्तेदाराची संपूर्ण रक्कम दिल्याचे सदस्यस्थितीस समोर येत आहे, ही बाब अतिशय गंभीर असून या प्रकरणात आर्थिक अपहार झाला, असे म्हणावे लागेल. या अपुर्ण कामाचे बिल ठेकेदाराला आदा करण्यासाठी ज्या अधिकारी अथवा कर्मचायांनी मदत केली. त्या सर्व कर्मचायावर आणि संबंधित मक्तेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. याशिवाय सदरच्या अपुर्ण कामाची होणारी रक्कम मक्तेदाराकडून व्याजासहीत वसुल करावी. अथवा त्याच्याकडून प्रलंबित रस्ता दुभाजक (रोड डिव्हायडर) काम पुर्ण करुन घेऊनच बिलाची रक्कम आदा करावी. याविषयी संबंधित दोषीवर योग्य ती कार्यवाही करावी. याबाबत कारवाई न झाल्यास नाईलाजास्तव न्यायालयात दाद मागावी लागेल. पुढील होणाया परिणामास मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा शेडजी मोहीते यांनी दिला आहे.