सांगली प्रतिनिधी
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी टेंभू योजनेच्या विस्तारित योजनेला मान्यता आणि त्यासाठी खर्चाची सुधारित प्रशासकीय मान्यता एका महिन्याच्या आत देण्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन मिळाल्याने दिवंगत आर.आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील आणि पुत्र रोहित पाटील यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी मागे घेण्यात आले.
तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यातील उर्वरित गावांच्या पाणी प्रश्नासाठी सोमवारपासून सुमनताई आणि रोहित पाटील यांचे सांगलीच्या जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण सुरू होते. या आंदोलनाला निश्चित दिशा मिळावी आणि प्रश्न मार्गी लावा यासाठी मंगळवारी दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लक्ष घातले. या प्रश्नावर कोणत्या पद्धतीने मार्ग काढावा याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
आबा परिवार आणि सरकारमधील दुवा असलेले आमदार अनिल भाऊ बाबर यांच्यावर चर्चेची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानुसार सायंकाळी आमदार बाबर सुमनताईंचीआंदोलन स्थळी भेट घेतील आणि उपस्थित गावकऱ्यांची चर्चा करतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आमदार बाबर यांनी आंदोलकांशी चर्चा केली आणि थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन जोडून दिला. हा फोन थेट स्पीकर वरून उपस्थितांना ऐकविण्यात आला. त्यानंतर गावकऱ्यांच्या संमतीने पाटील मायलेकांचे उपोषण मागे घेण्याचा निर्णय करण्यात आला. आमदार अनिल भाऊ बाबर, जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले.
उपोषण सुटल्यानंतर रोहित पाटील यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारचे आभार मानताना एक महिन्यात हा प्रश्न सुटला नाही तर मंत्रालयासमोर उपोषण करण्याची घोषणा केली.
सचिवांच्या पत्रासाठी आग्रह
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना याबाबत पत्र देण्याच्या सूचना दिल्या, मात्र रोहित पाटील यांनी सचिवांच्या सहीचे पत्र मागितले, त्यावर या गावांचा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे पत्र सचिव यांनी पाठवले, हे पत्र जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी आंदोलनस्थळवर दिले, तर आमदार अनिल बाबर यांच्याहस्ते रस घेऊन रोहित पाटील यांनी आंदोलन स्थगित केले.
फडणवीस यांनी मोबाइलवरून संपर्क साधून या १८ गावांच्या समावेश टेंभू योजनेत करून त्याना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र आम्ही एका महिन्यात ती देण्याचा विश्वास देतो असे यावेळी सांगितले.
या गावांना लाभ
तासगाव तालुक्यातील सावळज, सिद्धेवाडी, दहिवडी, जरंडी, यामगरवाडी, वायफळे, बिरणवाडी, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी तर कवठेमहांकाळ तालुक्यातील जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, रायवादी, केरेवाडी आणि शेळकेवाडी या गावांना टेंभू योजनेत समावेश करून त्या गावांना पाणी देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभ होणार आहे.