विटा प्रतिनिधी
जिल्ह्यातला किंबहुना या मतदारसंघातला मतदार जाग्यावर आहे. फक्त आपली कार्यकर्त्यांची भक्कमपणे मोट बांधायची आहे. कोणी काहीही म्हणू दे काँग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे. या जिल्ह्यात काँग्रेस हाच एक नंबरचा पक्ष असणार आहे, असा विश्वास काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांनी व्यक्त केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त खानापूर तालुका सेवा दलाच्यावतीने येथील काँग्रेस कमिटी मध्ये अभिवादन आणि मेळावा घेण्यात आला. या वेळी तालुक्यातील जवळपास15 गावातील सेवादलाच्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांना निवडपत्रे देण्यात आली.
काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांच्यासह युथ काँग्रेसचे निरीक्षक महेश म्हेत्रे, मजूर फेडरेशनचे संचालक रविंद्र भिंगारदेवे, विलास बापू पाटील, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष अशोक साळुंखे, शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजीत पाटील, बाजार समिती संचालक अरुण जाधव, पक्ष निरीक्षक गजानन सुतार, सुमित गायकवाड, जिल्हा इंटकचे रवींद्र साठे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जितेश कदम म्हणाले, राज्यात एवढी राजकीय उलथापालथ झाली असताना सुद्धा जिल्ह्यातला किंबहुना या मतदारसंघातला काँग्रेसचा कार्यकर्ता ठामपणे पक्षाच्या मागे उभा आहे. कोणी काहीही म्हणू दे काँग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे. या जिल्ह्यात काँग्रेस हाच एक नंबरचा पक्ष असणार आहे. आजही ३५ वर्षा पुढच्या सगळा मतदार काँग्रेसच्या विचाराचा आहे. घोटाळा झाला आहे तो फक्त १८ ते ३५ वयोगटातील तरुण मंडळींचा. कारण गेल्या दहा-बारा वर्षा पासून भाजपने समाज माध्यमातून जातीय धर्माची विषारी बीजे पेरली आणि त्याला ही मंडळी बळी पडली. येणारी माहिती प्रत्येक मेसेज किंवा फोटो खरा आहे किंवा नाही याबद्दल ही मंडळी अनभिज्ञ होती. दर वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देतो असे सांगितले, तरुण मंडळी या सगळ्याला फसली. या तरुण वर्गाला पुन्हा एकदा आपल्या देशाची खरी संस्कृती आणि इतिहास समजावून सांगण्याची गरज आहे.
जिल्ह्यातला किंबहुना या मतदारसंघातला मतदार जाग्यावर आहे. फक्त आपली कार्यकर्त्यांची भक्कमपणे मोट बांधायची आहे. खानापूर मतदारसंघातली काँग्रेस कोणाच्याही दावणीला बांधणार नाही, असेही कदम यांनी सांगितले. दरम्यान यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी जितेश कदम यांना खानापूर मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी करण्याचा आग्रह केला. त्यावर त्यांनी वेळ आल्यानंतर पाहू असे उत्तर दिले. यावेळी सेवा दलाचे मच्छिंद्र महापुरे, निखिल सुतार, राजाराम साठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.