सांगली विभागाकडून दोन दिवसात साडेतीन कोटींचा महसूल
सांगली : दिवाळी हा सर्वाधिक प्रवासाचा हंगाम समजला जातो. नोकरी-व्यवसायानिमित्त दूर शहरात राहणारे नागरिक दरवर्षी याच काळात गावी परततात. त्यासाठी सरकारी परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीकडून विशेष फेऱ्या चालवल्या जातात.
यंदाही सांगली एसटीने दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी सुयोग्य नियोजन केले. जादा बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे केवळ २३ व २४ ऑक्टोबर या दोन दिवसांतच सांगली एसटीला तब्बल ३ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले, हे मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भाऊबीजचा हा परतीच्या प्रवासासाठी सर्वाधिक गर्दीचा असतो. त्यामुळे यंदा सांगली विभागाने एकूण ६८० बसेस प्रवाशांच्या सेवेत उतरवल्या.
सांगलीहून मुंबई, पुणे, सोलापूर, सातारा या लांब पल्ल्याच्या मार्गाबरोबरच कराड, कोल्हापूर, इचलकरंजी आदी जवळच्या शहरांसाठीही बाढीव फेऱ्या करण्यात आल्या. नागरिकांना तिकीटांसाठी गर्दीत उभे राहावे लागू नये, प्रत्येकाला बस उपलब्ध व्हावी आणि सुरक्षित, वेळेबर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी नियोजन करण्यात आले होते. सांगली विभागातील दहा डेपो मिळून मिळालेले हे उत्पन्न समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले.
ही कामगिरी फक्त बसेसची संख्या वाढवून साध्य झालेली नाही, तर चालक-वाहकांची वेळेवर उपस्थिती, प्रवाशांची सेवा भावना, नियंत्रण कक्षातून केलेले नियोजन आणि प्रत्यक्ष मार्गावरील व्यवस्थापन या सर्वांचा परिणाम असल्याचे नियंत्रकांनी नमूद केले.
या यशात सांगली विभाग नियंत्रक सुनील भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील, सहाय्यक वाहतूक अधिकारी प्रवीण डोंगरे, तसेच सर्व विभागीय व्यवस्थापक, अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक आणि प्रवासी बांधव यांचे योगदान असल्याचे सांगली एसटी विभागाच्या वतीने कळविण्यात आले. प्रवाशांनी दाखविलेल्या विश्वासाचे है फलित असल्याचेही सांगण्यात आले असून, आगामी यात्रेच्या हंगामातही सांगली विभाग अधिक सश्चम तयारी ठेवेल, असे सांगण्यात आले आहे.








