राजाने मारले आणि पावसाने झोडपले, शेती कामांची घडी विस्कटली
शिराळा : पश्चिम महाराष्ट्रातील शिराळा तालुक्याचा पश्चिम भाग भातपिकासाठी प्रसिद्ध असून तो ‘भात पिकाचे कोठार’ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी येथे भाताची पेरणी केली जाते. मात्र यंदा मे महिन्यातच पावसाने ऐनवेळी अवकाळी आगमन करून सर्वच शेतीच्या कामांची घडी विस्कटून टाकली आहे. मागील आठवड्याभरात या भागात अवकाळीचा जोर वाढला असून त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
पेरणीपूर्वी शेतातील बांध घालणे, गवताची वेचणी करून जाळणे, शेणखत व गाडीखत मिसळणे, नांगरणी, रोटाव्हेरटने मशागत करणे अशा विविध कामांची तयारी केली जाते. मात्र सध्या शिवारात पाणीच पाणी असल्याने या साऱ्या कामांवर पाणी फिरले आहे. अनेक ठिकाणी मशागतीसाठी शेतात बैलडी घालता येत नाहीत.
काही शेतकऱ्यांची शाळू काढणी पूर्ण झालेली नसताना पावसाने ती कामेही थांबवली आहेत. तर अनेक ठिकाणी शाळूचा कडबा शिवारात सडत आहे. डोंगराळ आणि पावसावर अवलंबून असलेला शिराळा तालुका बागायती शेतीसाठी कमी अनुकूल आहे. येथील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असून त्यांच्याकडे सिंचनाचीही मर्यादित साधने आहेत. त्यामुळे पावसाचा विसंवाद त्यांच्या उपजीविकेला आव्हान ठरतो.
यंदा पावसाने आधी काढणीवर आणि आता पेरणीवर घाला घातल्याने शेतीचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, शेतीच्या इनपुट खर्चात प्रचंड वाढ झाली आहे, बियाणे व खते महाग झाली आहेत. अशा परिस्थितीत मेहनतीने उत्पादन घेतले, तरी नफा मिळणे दूरच, शेतकऱ्यांना तोटाच सहन करावा लागतो.
गेल्या हंगामात भात काढणीच्या काळात पावसाने केलेल्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळाली नाही. त्यात आता यंदाची पेरणीच वेळेत होणार की नाही, याबाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. गावात रोजगाराच्या संधी नसल्याने अनेक कुटुंबांचे तरुण मुंबई, पुणे अशा शहरांमध्ये मजुरीसाठी गेले आहेत. गावात उरले आहेत ते वृद्ध आणि काही तरुण शेतकरी, जे शेतीच्या आधाराने जगत आहेत. पण त्यांनाही नैसर्गिक संकटांमुळे शेतीवरचा विश्वास उडताना दिसतो आहे.
“राजाने मारले आणि पावसाने झोडपले” अशा अवस्थेला आलेल्या शेतकयांसाठी कुठलीही ठोस मदत शासनाकडून मिळताना दिसत नाही. नैसर्गिक आपत्ती फंडातून तत्काळ मदत मिळावी, विम्याच्या दाव्याची कार्यवाही व्हावी आणि शेतीच्या बांधावरच समाधान मानणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा आशेचा किरण दिसावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
कोकरुड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये भात पेरणीपूर्व मशागती करण्याच्या अगोदरच पावसाने झोडपल्याने भात पेरणी संकटात आहे तर शिवारात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळीने सलग पाचव्या दिवशीही पश्चिम भागाला झोडपले असून सर्व शिवारामध्ये पाणीच पाणी साचले आहे.
२० मे पासून भात पेरणी मुहूर्त सुरू झाल्याने शेतकरी भात पेरणी पूर्व मशागती सुरू करण्याच्या तयारीत असतानाच अवकाळी पावसाने सुरुवात केल्याने मशागती थांबल्या आहेत. काही शेतकऱ्यांची काढणीस आलेली मका पिके शेतात तशीच उभी आहेत. ही पिके काढायची कधी आणि शेतीची मशागत करायची कधी असा प्रश्र पडला आहे.
पाच तारखेनंतर मान्सून महाराष्ट्र मध्ये दाखल होणार असून दहा तारखे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होणार अशी शक्यता वेधशाळेने दर्शवली आहे. सध्या अवकाळीने शेतात पाणीच पाणी केल्यामुळे शेत पाण्याने तुडुंब आहेत. अवकाळी थांबून कडक ऊन लागले तर ज्या रानातील ओलावा कमी होईल अन्यथा भात पेरणी कशी करायची असा प्रश्र शेतकयांच्या समोर उभा राहिला आहे.
एकंदरीत परिस्थिती पाहता यावर्षी भात पेरणीची शक्यता दुरावत आहे. भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या तालुक्यामध्ये १० टक्के तरी भात पेरणी पूर्ण होते की नाही अशी शंका आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या शेतामधील मक्याचे पीक काढणीस आले असून या अवकाळी पावसामुळे मका पिके रानामध्ये तशीच उभी आहेत.








