आरोपी शिराळ्याचा; घरात बोलवून केला होता अत्याचार
इस्लामपूर प्रतिनिधी
शिराळा येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी महमंद बाबू घोरी (38 रा. नवजीवन वसाहत शिराळा) याला न्यायालयाने 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा दिली. पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी ही शिक्षा सुनावली.
26 मे 2021 रोजी अल्पवयीन मुलगी ही खेळत असताना आरोपी घोरी याने तिला घरामध्ये नेवून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगू नको, अशी धमकी दिली. याबाबत त्याच्यावर शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या आरोपीस अटक करून इस्लामपूर येथील न्यायालयात त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील आर. एस. पाटील यांनी काम पाहिले. यामध्ये आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, पीडित मुलगी, पंच, मेडीकल ऑफिसर, वयाचा दाखला देणारे अधिकारी व तपासी अंमलदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. दरम्यान, आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद ऍड. पाटील यांनी केला.
न्यायाधीश गांधी यांनी पुराव्याच्या आधारे बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम 6 नुसार 20 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रूपये दंड व दंड न भरलेस सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली. पोलीस निरीक्षक एस. जी. चिल्लावार यांनी या गुह्याचा तपास केला. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे, सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत कांबळे यांनी सरकार पक्षास मदत केली.








