जुन्या सातारा जिल्ह्यात पावणे सहा लाख कुणबी : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागेल ही भिती अनाठायी
विटा प्रतिनिधी
कुणबी समाज हा व्यवसाय वाचक समाज आहे. ओबीसी जात पडताळणीसाठी 1967 पूर्वीचा पुरावा द्यावा लागतो. त्याच पद्धतीने 1967 पूर्वी ज्यांच्या नावे शेती आहे, जो शेती करत होता, याचा पुरावा सादर करेल, त्यांना कुणबी म्हणून ओबीसींचा दाखला देण्यात यावा, अशी मागणी अॅड. संदीप मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, मनोज देवकर उपस्थित होते.
याबाबत अॅड. संदीप मुळीक यांनी दिलेली माहिती अशी, स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा जिल्ह्यात सध्याचा सातारा आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव आणि पलूस या तालुक्यांचा समावेश होता. 1885 च्या सातारा गॅझेटिअर मधील नोंदीनुसार 1881 च्या जनगणनेत जिल्ह्याची लोकसंख्या 10 लाख 62 हजार 850 होती. त्यापैकी कुणबी समाजाची लोकसंख्या पाच लाख 83 हजार 569 होती. या जनगणनेत मराठा समाजाची स्वतंत्र जनगणना केलेली नव्हती. 1885 च्या सातारा गॅझेटिअरमधील नोंदीनुसार कुणबी जात व्यवसाय वाचक आहे. शेती करणारा कुणबी असा अर्थ आहे. तथापि 20 व्या शतकात जिल्ह्यात कुणबी जातीचे स्वतंत्र अस्तित्त्व आढळून येत नाही. ती मराठा जातीअंतर्गत लोप पावली असल्याचे आढळते, असे मुळीक यांनी म्हंटले आहे.
सध्याच्या वातावरणात ओबीसी समाजामध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला जात आहे. वस्तुत: धनगर समाजाला एनटी-2 मध्ये 3.5 टक्के, वंजारी समाजाला एनटी-3 मध्ये 2 टक्के, एसबीसी मध्ये कोष्टी वगैरे समाजाला 2 टक्के स्वतंत्र आरक्षण आहे. त्यामुळे कुणबी-मराठा आरक्षण दिल्यामुळे ओबीसींवर अन्याय होण्याची भिती अनाठायी आहे, असेही अॅड. मुळीक यांनी म्हंटले.
सध्या ओबीसीच्या 19 टक्के आरक्षणात कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी, लेवा-पाटील वगैरे जातीच्या विदर्भ, जळगाव, नांदेड, नाशिक या भागातील मराठा समाजाचा म्हणजेच जवळपास 50 टक्के समाजाचा समावेश आहेच. आता फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा या भागातील उर्वरित मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास इतर जातींना फार मोठा फरक पडणार नाही. त्यामुळे शासनाने ओबीसींच्या धर्तीवर 1967 च्या पूर्वीचा शेती करत असल्याचा पुरावा घ्यावा आणि मराठा समाजाला कुणबी-मराठा अथवा मराठा-कुणबी जातीचे ओबीसी सर्टीफिकेट द्यावे, अशी मागणी मुळीक यांनी यावेळी केली.