Sangli Robbery News :सांगली मार्केट यार्ड येथील सांगली मिरज रोड वरील रिलायन्स ज्वेल्स दरोडाप्रकरणी चौघांची नावे अखेर निष्पन्न झाली आहेत. गणेश उध्दव भद्रेवार (वय २४, रा. हैद्राबाद ), प्रताप अशोकसिंग राणा ( रा. वैशाली, बिहार ), कार्तिक नंदलाल मुजुमदार (२३, रा. हुगळी, पश्चिम बंगाल) आणि प्रिन्स कुमार सिंग (२४, रा. वैशाली, बिहार ) अशी संशयितांची नावे आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली.
४ जून रोजी सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सवर शस्त्र दरोडा टाकून सहा कोटी ४४ लाख रुपयांचे सोने-चांदी आणि हिऱ्यांचे दागिने लंपास करण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून या दरोड्याचा तपास पोलिस करत आहेत. टोळीतील प्रत्येकाला एकच काम द्यायचे आणि ते पूर्ण करून घ्यायचे नियोजन ते करत होते. भद्रेवार याने सांगलीतील रेकी केली होती. तीन महिन्यांपासून ते दरोड्याच्या तयारीत होते. यासाठी ते सांगलीत न राहता कोल्हापूरात राहीले होते, अशीही माहिती अधीक्षक डॉ. तेली यांनी दिली. लवकरच संशयित आरोपींना जेरबंद करू असा असा विश्वास दिला.