केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांचे आमदार सुरेश खाडे यांना आश्वासन
मिरज / प्रतिनिधी
मिरज विधानसभा क्षेत्र तसेच लगतच्या काही गावातील पाणी पाईप योजना पूर्णत्वास नेण्यासाठी काही ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग करून लाईनचे काम पूर्ण करण्याचे प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना दिले.
गुरुवारी खाडे यांनी मुंबई येथे केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. या प्रलंबित कामांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
मिरज विधानसभा क्षेत्रातील काही गावांसाठी केंद्रीय जलयोजना मंजूर झाली आहे. पाण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जल जीवन मिशन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र काही गावांची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता कृष्णानदी पश्चिमेकडून उत्तरेकडे वाहात आहे आणि पाण्यापासून वंचित गावे पूर्व बाजूस आहेत. जल मिशन योजनांचे स्रोत हे कृष्णानदी असल्याने या गावांपर्यंत पाणी नेण्यासाठी रेल्वे लाईन पार करून पाईप लाईन टाकावी लागणार आहे. अशी पाण्याची पाईप लाईन काही ठिकाणी हुबळी-मिरज-पुणे आणि मिरज-सोलापूर रेल्वे लाईन क्रॉस करून जाणार आहे. या कामांच्या मंजुरीसाठी ऑकटोबर-२०२१ मध्ये प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र ते अद्यापरसाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे जल जीवन मिशन योजनांचे काही ठिकाणचे काम अद्याप पूर्ण होऊ शकलेले नाही. सबब, यागावांमधील पाणी योजनांचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी ज्या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग करून पाईप लाईन नेण्याचे प्रस्ताव दाखल आहेत. त्या सर्व प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजुरी देण्याचे आदेश व्हावेत अशी मागणी सुरेश खाडे यांनी केली.
केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल व सदरच्या प्रस्तावना लवकरच मान्यता देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी दिली.