चांदोली, महाबळेश्वर, नवजामध्ये मुसळधार
सांगली प्रतिनिधी
नवजा आणि महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पावसाने जोर धरला नाही. कोयना धरणातील विसर्ग 2100 क्युसेस पर्यंत वाढवला आहे. जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये चांदोली परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याचे वृत्त आहे.
मंगळवारी सकाळपर्यंत कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 26 मिमी पाऊस पडला. तर दिवसभरात केवळ 16 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या धरणातील पाणीसाठा 10.80 टीएमसी असून 2100 क्युसेसपर्यंत विसर्ग वाढवला आहे. वारणा चांदोली धरणातील साठा 10.45 टीएमसी आहे. महाबळेश्वरमध्ये 49 तर नवजामध्ये 45 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मंगळवारी ढगाळ वातावरण आणि रिमझीम पावसाला सुरूवात झाली आहे मिरज आणि सांगली शहरात दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. इस्लामपुर परिसरात किरकोळ पाऊस झाला. तर मिरज पश्चिम भागात पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. मिरज पूर्व भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. तर शिराळा तालुक्यात मंगळवारी तुरळक सरी झाल्या. चांदोली परिसरात चांगला पाऊस झाला आहे. शेतकरी वर्ग भात, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागला आहे. आष्टा शहर व परिसरातही तुरळक सरींनी हजेरी लावली.
परंतु जत, आटपाडी आणि पलूस, मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळच्या काही भागात पावसाने चकवा दिला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा निर्माण झाला होता. परंतु मंगळवार कोरडाच गेला.








