प्रितम निकम, शिराळा
शिराळा तालुका हा डोंगरी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील उत्तर भागात मधील अंत्री खुर्द या गावातील ग्रामस्थांनी तब्बल ५१ वर्षापासून ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा अविरत सुरु ठेवून समाजापुढे एकीचा मोठा आदर्श ठेवला आहे. येथे असणाऱ्या गणपती मंदिरामधील मुळ मुर्ती ही स्वयं प्रकट झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. यामुळेच या गणपती मंदिरास स्वयंभू गणपती म्हणून संबोधले जाते.
शिराळा शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असणारे हे छोटेसे अंत्री खुर्द गाव या गावात १९७२ पासून ‘एक एक गणपती’ ही प्रथा चालू आहे. या मंडळाची स्थापना गावचे प्रतिष्ठित नागरिक हरी पाटील यांनी त्या काळामध्ये पुढाकार घेऊन सहकार्यांच्या समवेत केली. आजही गणेशोत्सव काळात या गावास यात्रेचे स्वरूप धारण होते. गणेशोत्सव काळात जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरून हजारो भाविक येथील स्वयंभू गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने येतात. गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ओळख व ख्याती आहे. या मंदिरातील मूळ मूर्ती हि येथे स्वतः उगम पावल्याचे मानले जाते. गणेशोत्सव काळात गावातील सर्व तरुण, आबालवृद्ध, महिला कोणताही राजकीय गट गट मानत नाहीत. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आराध्य दैवताच्या म्हणजे गणपती बाप्पाच्या सेवेसाठी सज्ज होतात. आपापल्यापरीने होईल की मदत करून आराध्य दैवताला महती देण्याचे काम सर्व ग्रामस्थ करतात. या गणपतीस स्वयंभू गणपती म्हणून संबोधले जाते.
गणेशोत्सव काळात भाविकांकडून येणाऱ्या उत्पन्नातून गणेश मंडळाचे व्यवस्थापक गावातील मंदिरे सुशोभिकरण करणे, गावातील रस्ते दुरुस्ती करणे, गोरगरीब आणि होतकरू मुलांना मदत करणे, गावातील पथदिवे दुरुस्ती आधी कामासाठी या पैशाचा उपयोग करून गावाची एकजूट कायम ठेवतात. भाद्रपद शुध्द त्रयोदशीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी काळात मंदिरात भजन किर्तन, शालेय कार्यक्रम, पोवाडे अधिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अंत्री खुर्द हे गाव शिराळा उत्तर भागात डोंगरदर्यात वसलेले आहे. या गावातील बहुतांश जमीन डोंगराळ व कोरडवाहू असल्याने बहुतांशी तरुण, अबालवृद्ध हे नोकरी व व्यवसायासाठी पुणे मुंबई आदी शहराकडे वास्तव्यास आहेत. परंतु गणेशोत्सव काळात मात्र बाहेर गावी असणारे गावकरी व सासुरवाशनींची पावले आपल्या जन्म गावी वळतात. सर्वजण एकत्र येऊन गणेशाची व येथे येणाऱ्या भाविकांची मनोभावे सेवा करतात .