सांगली जिल्हा शिवसेनेचे एकनाथ शिंदेंना समर्थन; अडीच वर्षात राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी / इस्लामपूर
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगली जिल्हयात शिवसेनेची मुस्कटदाबी करण्यात आली. हे चित्र संपूर्ण राज्यात असल्यानेच मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केले. त्यांची भूमिका योग्य असून आम्ही त्यांनाच समर्थन देणार असल्याची माहिती सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख आनंदराव पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली. पत्रकार बैठकीनंतर त्यांच्यासह शिवसैनिकांनी तहसील कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर येत घोषणाबाजी करत आपली भूमिका उघड केली.
पत्रकार बैठकीत बोलताना पवार म्हणाले, महाविकास आघाडीत शिवसेना मुख्य घटक पक्ष असतानाही सांगली जिल्हात पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवसैनिकांना दुय्यम वागणूक दिली. इस्लामपूर शहरातील भुयारी गटार योजनेमुळे रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यासाठी शिंदे यांच्या माध्यमातून ११ कोटी रुपयांचा निधी आणला. मात्र शिवसेनेला श्रेय जावू नये, म्हणून हा निधी रोखण्याचे पाप पालकमंत्री पाटील यांनी केले. शिवसेनेमुळे भोगत असणाऱ्या पालकमंत्री पदाचा पाटील यांनी गैरवापर केल्याचा आरोप करुन पवार म्हणाले, युवा सेनेचे पदाधिकारी तसेच शिवसैनिकांवर अॅट्रोसिटी, मोका, खून सारख्या गुन्हयात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादीत येण्यासाठी दबावतंत्र वापरून सांगली जिल्हयातून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला. जिल्हयातील वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची एक ही संधी त्यांनी सोडली नाही.
पवार पुढे म्हणाले, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्हयात खर्च झाला आहे. त्यापैकी पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी करून ही शिवसेनेला डावलण्यात आले. शहरातील २४ बाय ७ पाणी योजनेसाठी मंत्री शिंदे व गुलाबराव पाटील यांनी निधी देण्याचा शब्द दिला आहे. राष्ट्रवादीच्या कोंबड्याने दिवस उगवावा, अशी मानसिकता असल्यानेच हे बंड झाले आहे. आम्ही हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत. त्यामुळे आमचे बंड शिवसेना विरोधी नसून राष्ट्रवादीच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाप्रमुख सागर मलगुंडे जेष्ठ नेते दि. बा. पाटील, माजी नगरसेवक शकील सय्यद, प्रदीप लोहार, अंकुश माने यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
ठाकरेंच्या फोटो विना पोस्टर
पत्रकार बैठकीनंतर पवार यांनी जेष्ठ नेते दि.बा. पाटील, तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, शहर प्रमुख शकील सय्यद यांच्यासह यल्लामा चौकातून घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर बंडाचे शक्तीप्रदर्शन केले. याठिकाणीही त्यांच्यासह अन्य नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ठ केली. या दरम्यान पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, व पवार यांनी स्वतःचा फोटो वापरला होता.
नगरपालिका धनुष्यबाण चिन्हावर लढणार
यावेळी पवार म्हणाले, राज्यातील सत्ता बदलानंतर तोंडावर नगरपालिका निवडणूका होत आहे. इस्लामपूर शहरात ही निवडणूक शिवसेनेचे धनुष्यबाण या चिन्हावरच लढवणार आहोत. यावेळी शिवसेनेच्या जागांत निश्चित वाढ होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.