शिराळा : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे वॉरंट हुकुम होऊन देखील हजर न राहिलेने न्यायालयाने आज पुन्हा अजामीन पात्र वॉरंटचा आदेश जारी केला आहे. पुढील तारीख ११ जुलै २०२२ दिलेली आहे. त्याचप्रमाणे मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिल्याने त्यांचा अजामीन पात्र वॉरंटचा आदेश रद्द केला आहे अशी माहिती ॲड. रवी पाटील यांनी दिली. शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात नियमित फौजदारी खटला सुनावणी होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आरोपी क्र.9 तर शिरीष पारकर हे आरोपी क्र.10 म्हणून समाविष्ट आहेत. यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी आज न्यायालयात हजर राहून १५ हजाराचा जामीन दिला. यावेळी न्यायालयाने त्यांचे विरुद्ध केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला. आरोपी क्र. 9 राज ठाकरे हे वॉरंट हुकुम होऊन देखील न्यायालयात हजर राहिले नाहीत म्हणून न्यायालयाने त्यांचे विरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला आहे. आता यापुढील तारीख ११ जुलै २०२२ अशी आहे.
राज ठाकरे यांच्या विरुद्ध यापूर्वी झालेला अजामीनपात्र वॉरंट आदेश रद्द व्हावा म्हणून इस्लामपूर येथील सेशन जज साहेब यांचे कोर्टात क्रिमिनल रिव्हिजन क्रमांक १३/२२ दाखल असून त्याबाबत कोकरुड पोलिसांची कागदपत्रे येण्यासाठी पुढील सुनावणी दिनांक ९ जून २०२२ अशी आहे. शिराळा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याबद्दल येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. सातपुते यांनी २८ एप्रिल २०२२ अजामिनपात्र वॉरंट बजावले आहे. त्यामुळे बुधवार दिनांक ८ रोजी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शिरीष पारकर यांच्या सह दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावने, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच २८ जानेवारी, २५ जानेवारी, ११ फेब्रुवारी व २८ एप्रिल २०२२ या तारखांना गैरहजर राहिल्याबद्दल यांच्यावर शिराळा न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सन २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर सन २००८ ला रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसे तर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल रेल्वेच्या कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्यावेळी त्यांना रत्नागिरी येथून अटक करून कल्याण न्यायालयात नेण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारला होता. यावेळी शिराळा तालुका मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून तानाजी सावंत यांच्यासह अन्य जणांवर गुन्हे दाखल झाले होते.
जानेवारी २०२२ मध्ये न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांनी या दोघांना का अटक केली नाही अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यासाठी राज ठाकरे यांना दि. ८ जून २०२२ रोजी बुधवारी शिराळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत हे काही कारणास्तव न्यायालयात हजर राहिले नाहीत. मात्र मनसे नेते शिरीष पारकर न्यायालयात उपस्थितीत राहिले होते.