शिराळा / वार्ताहर
शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा बुधवार दिनांक २० रोजी होणार असून त्याला मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येन उपस्थिती लावावी, असे आवाहन युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटीलसाहेब यांनी राज्यातील प्रत्येक कार्यकर्त्याशी थेट संवाद साधण्यासाठी परिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. शिराळा विधानसभा मतदार संघातील यात्रेचा कार्यक्रम बुधवारी दिनांक २० रोजी रेड (ता. शिराळा) येथील एैश्वर्या मल्टीपरर्पस हॉल येथे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील प्रमुख मार्गदर्शक आहेत. शिराळा मतदार संघाचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रुपालीताई चाकणकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व सांगली जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अविनाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक व शिराळा मतदार संघातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आदी प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत.
जिल्हाध्यक्ष नाईक पुढे म्हणाले, शिराळा विधासभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची मजबूत पकड आहे किंबहुना क्रमांक एकचा पक्ष आहे. बहुतांश ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, सेवा सोसायटी, बाजार समिती आदी संस्थावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांनी सातत्याने केलेल्या विकास कामामुळे भविष्यातील निवडणुकांमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे बुधवारी होणारा कार्यकर्ता संवाद यात्रा कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी त्यास उपस्थिती लावावी, असे आवाहन त्यांनी केले.