दोन कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा, नातेवाईकांच्या खात्यावर पैसे वळविले
मिरज / प्रतिनिधी
एसटी कर्मचारी बँकेच्या मिरज शाखेत दोघा कर्मचाऱ्यांनी संगनमत करुन दोन लाख, 75 हजार, 415 रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेचे महाव्यवस्थापक सुर्यकांत गोविंद्र जगताप (वय 57, रा. ओरीयंट व्हीला, को-ऑप हाऊसिंग सोसायटी, सर्व्हे नं. 266, मसोबा मंदिराजवळ, हडपसर, पुणे) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजित गजानन जाधव (रा. शिरोळ, पोलिस ठाण्याच्या पाठीमागे, शिरोळ) आणि सुभाष विश्वनाथ पाटील (रा. वरचे गल्ली, तासगांव) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, मिरज मध्यवर्ती एसटी स्थानकाजवळ एसटी कर्मचारी बँकेची शाखा आहे. येथे सुजित जाधव आणि सुभाष पाटील हे दोघे कार्यरत होते. एसटी महामंडळाच्या वसूली पत्रकाप्रमाणे वसूल होऊन आलेली रक्कम सभासदांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाते. मात्र, त्यावर अतिरीक्त असलेली रक्कम एसटी बँकेच्या एक्सेस खात्यावर जमा केली जाते. मात्र सदर दोघा कर्मचाऱ्यांनी उर्वरित रक्कम एक्सेस खात्यावर जमा न करता स्वत:च्या नातेवाईकांचा खात्यावर वळवून परस्पर काढून घेतली. सदर दोघांनी आत्तापर्यंत दोन लाख, ७५ हजार, ४१५ रुपयांचा अपहार केला आहे. याप्रकरणी गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.









