गेल्या सात महिन्यांपासून तो बेपत्ता असलेल्या काझीने अटकपूर्व जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत धावपळ केली होती
मिरज : शहरातील हॉटेल व्यावसायिक स्पर्धेतून दर्गा रोडवरील अफगाण हॉटेलमध्ये घुसून तोडफोड केल्याप्रकरणी काझी टोळीचा प्रमुख मुख्य संशयित असलम महंमद काझी (रा. नदाफ गल्ली, गुऊवार पेठ, मिरज) याला मिरज शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. गेल्या सात महिन्यांपासून तो बेपत्ता होता. अटकपूर्व जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत धावपळ केली होती. मात्र, अटकपूर्वचा अर्ज फेटाळताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शहरातील दर्गा रोड येथे नव्याने हॉटेल अफगाण सुरू केले आहे. तर याच रोडवर हॉटेल नूर आहे. याच हॉटेल व्यावसायिक स्पर्धेतून 27 सप्टेंबर 2024 रोजी काझी टोळीने अफगाण हॉटेलमध्ये घुसून समीर कुपवाडे यांच्या कुटुंबियांना मारहाण करून हॉटेलची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. हॉ टेलमधील सीसीटीव्ही कॅमेराचे डिव्हीआर सुध्दा लंपास केला होता. मिरज शहर पोलिसांनी काझी टोळीतील सात जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली होती. मात्र, मुख्य संशयीत असलम काझी बेपत्ता झाला होता.
संशयीत अस्लम काझीने जिल्हा न्यायालयात दोन वेळा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता, न्यायालयाने अटकपूर्व अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयाने सुध्दा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेंव्हापासून अस्लम काझी सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. शनिवारी सकाळी मिरज शहर पोलिसांनी त्याला कोल्हापूर रोडवरील एका शेतातून अटक केली.








