61 हजारांचा मुद्देमाल जप्त, महात्मा गांधी चौकी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/मिरज
शहरात गांजा तस्करी करणाऱ्या दोघाना अटक करुन महात्मा गांधी चौकी पोलिसांनी सुमारे 23 हजार रुपयांचा गांजा, मोटारसायकल, मोबाईल आणि रोख रक्कम असा 61 हजार, 814 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मौला हसन टीमकर (वय 32, रा. रॉकेल डेपो झोपडपट्टी, मिरज) आणि गणेश नागाप्पा शिंदे (वय 29, रा. हुबळी, कर्नाटक) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सांगली रस्त्यावरील मारुती मंदिर ते पालवी हॉटेल या मार्गावर दोघे तरुण गांजा तस्करीसाठी आल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सापळा लावला होता. यावेळी मौला टीमकर आणि गणेश शिंदे हे दोघे तरुण संशयास्पदरित्या आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडून झडती घेतली असता त्यांच्याजवळ 23 हजार, 274 रुपयांचा गांजा मिळून आला.
गांधी चौकी पोलिसांनी सदर दोघा तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 23 हजारांचा गांजा, मोटारसायकल, मोबाईल आणि रोख रक्कम असा 61 हजार 814 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.








