राज्य उत्पादन शुल्काची कारवाई, दोघांना अटक
प्रतिनिधी/मिरज
कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथे सापळा लावून गोवामेड दारु वाहतूक करणारी टेंपो पकडण्यात आली. याप्रकरणी मिलिंद लक्ष्मण मलमे (रा. घोरपडी) व वाहन मालक भगवान सुखदेव करचे (रा. पाचेगाव बुद्रुक, ता. सांगोला, जि. सोलापूर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून गोवा बनावट विदेशी मद्याच्या 836 बाटल्यांची 12 फ्लास्टिक पोती, बनावट बुचेसह तीन लाख, 20 हजार, 930 रुपयांच्या गोवामेड दारुसह महिंद्रा बुलेरो चारचाकी असा आठ लाख, 26 हजार 20 रुपया चा मुद्देमाल जफ्त करण्यात आला आहे.
घोरपडी गावात बेकायदा गोवामेड बनावटीची विदेशी दारु आयात केली जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा लावला होता. यावेळी महिंद्रा बोलेरो (एमएच-10-के-9773) मधून दोघेजण संशयास्पद रित्या जाताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना पकडून चारचाकीची झडती घेतली असता गाडीत गोवा बनावटीची विदेशी दारु मिळून आली.
या गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्यांवर महाराष्ट्र बनावटीचे लेबल, बुचे यांचा वापर करून 180 मि.ली. च्या रिकाम्या बाटल्यात बनावट मद्य भरून त्याची विक्री करण्यासाठी वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी सदर दारुसाठय़ासह बुलेरो गाडी असा आठ लाख, 26 हजारांचा मुद्देमाल जफ्त केला. याप्रकरणी मिलिंद मलमे, भगवान करचे या दोघांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक अरुण कोळी करीत आहेत.








