जत, प्रतिनिधी
Sangli Jat Farmers Agitation : जत तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धरणात पाणीसाठा कमी असला तरी लवकरच जतकरांच्या पिण्याच्या पाण्याची, शेतकऱ्यांच्या शेतीची तहान भागविण्यासाठी म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती खा. संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याकडून माहिती घेतली आहे, जतला लागेल ती मदत आम्ही करू चिंता करू नका, हा खासदार तुमच्या पाठीशी ठाम आहे असेही ते म्हणाले.
जत तालुक्यात सध्या दुष्काळाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जतकर आंदोलनात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे तहसिल कार्यालायसमोर धरणे आंदोलन,चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा महाराज यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन, काँग्रेसच्या वतीने शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजपच्या वतीने सोमवारी तर डफळापूर गटातील शेतकरी बुधवारी डफळापुरात रस्ता रोको आंदोलन करणार आहेत.
जतच्या दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर खा. संजयकाका पाटील यांनी जत येथे आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर बोलताना खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले की, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे जतच्या दुष्काळाबाबत जागरूक आहेत. मंत्री फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री आपणास फोन करून जतचा आढावा घेतला. शनिवारी मंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडूनही माहिती घेतली आहे. जतचा दुष्काळ हा भयावह आहे, सध्या कोयना धरणात पाणीसाठा कमी आहे असे असले तरी दुष्काळी जत तालुक्याला पाणी सोडण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. धरणात जतला पाणी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडावे अशा स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री फडणवीस यांनी आपणास सांगितले आहे. बुधवार पर्यत जतला म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात येईल असे मंत्री फडणवीस यांनी सांगितल्याचे खा. संजयकाका पाटील यांनी सांगितले.








