भव्य मिरवणूक, प्रचंड उत्साहात ३४ वर्षांची प्रतीक्षा संपली
जत प्रतिनिधी
जत शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती औरंगाबाद येथून सोमवारी मध्यरात्री आणण्यात आला. मंगळवारी जत शहरातून मोठ्या जल्लोषात मिरवणुक काढून सायंकाळी पुतळा जत-सांगली मार्गावरील डॉ.आंबेडकर उद्यान येथे विराजमान करण्यात आला. सामुदायिक श्रीशरण पंचशील भीम वंदना वंदन करून पुतळा बसविण्यात आला.
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा गौतम बुद्धांच्या मुर्तीसह मोठ्या ट्रकमध्ये सजविण्यात आली होती. ही मिरवणुक सोलनकर चौकातून आंबेडकरनगर येथे येऊन पुढे महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, मंगळवार पेठ, लोखंडी पूल संभाजी चौक यामार्गे उद्यान परीसरात आणण्यात आली. लोकार्पण सोहळा महिन्याभरानंतर घेण्यात येईल, अशी माहिती पुतळा समितीचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली.
यावेळी पुतळा समितीचे अध्यक्ष अशोक कांबळे, रिपाईचे संजय कांबळे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, अतुल कांबळे, माजी आमदार विलासराव जगताप आदींनी ही पुतळ्यास अभिवादन केले. या मिरवणुकीसाठी खेडो- पाड्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुतळा बसविण्यासाठी जत येथील आंबेडकरप्रेमी १९६४ पासून लढा देत होते. अखेर मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे औरंगाबाद येथून जतला आगमन झाले. नियोजित चबुतऱ्यावर भव्य दिव्य मिरवणुकीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२ फुटी उभा पुतळा विराजमान करण्यात आला. मागील ५८ वर्षापासूनची जतमधील आंबेडकर प्रेमींची स्वप्नपूर्ती झाली.
१२ फुटी पुतळा
जत शहराच्या वैभवात व संस्कृतीत भर घालणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा, यासाठी २००४ साली समिती गठीत करण्यात आली. समितीने पूर्ण परवानग्या घेत औरंगाबाद येथील मूर्तिकाराकडे १२ फुटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे नियोजन केले. लोकवर्गणीतून पुतळा उभारण्यात आला.








