पाच वर्षे पाठपुरावा; नगरपालिकेचे प्रशासनाचे दुर्लक्ष
जत, प्रतिनिधी
जत शहरात व मुख्य बाजार पेठेत एकही स्वतंत्र महिला स्वच्छतागृह नसल्याने स्वतंत्र महिला स्वच्छतागृह सुरु करण्यासाठी भाजी विक्रेत्या महिलांकडे भीक मागून भिकमाग आंदोलन करण्यात आले. जमा झालेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे आदोलकांनी सांगितले.
गेली पाच वर्षे आम्ही जत शहरात स्वतंत्र महिला स्वच्छतागृह सुरु करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन दिले गेले आहे. जत शहराला महीला नगराध्यक्ष आणि 50% महिला प्रतिनिधी लाभले असतानाही जत शहरात एकही स्वतंत्र महिला स्वच्छतागृह सुरू झालेली नाही. यामुळे महीलांची मोठी गैरसोय होत असून आता प्रशासन येत्या काळात स्वच्छतागृह सुरू करतील, अशी अपेक्षा आंदोलकांनी केली. शहरात पण तयार स्वच्छतागृहाचे सांगाडे फक्त ठेवण्यात आले असून तेही अशा ठिकाणी ठेवले आहेत की तिथं कुठलीही महीला जाणार नाही. असेही आंदोलकांनी म्हटले आहे.
दरम्यान, निधी खर्च करूनही महिलांची स्वच्छतागृह सुरू केल्या नाहीत. यासाठी आज शहरातील महीलांनी भीक मागून जिल्हाधिकारी यांच्याकडे मनीऑर्डर करत असल्याचे सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र महिला स्वच्छतागृह सुरू करण्याचे आदेश देऊन रक्षाबंधन दिनी माता भगिनींना भेट द्यावी असे या आंदोलनाचे समन्वयक विक्रम ढोणे यांनी म्हटले आहे. या आंदोलनात भाजी विक्रेत्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








