सांगली प्रतिनिधी
पावसाने मंगळवारी सांगली शहराला अक्षरश: झोडपून काढले. तब्बल सव्वा तास पाऊस एकसारखा कोसळत होता. यामुळे शहरासह उपनगरांमध्ये एकच दाणादाण उडाली. शहरातील अनेक चौकात पाण्याची तळी निर्माण झाली. महापालिकेच्या दारातच पाण्याचा डोह निर्माण झाला. गुंठेवारीतील नागरिकांची दैना उडाली. तर छत्रपती शिवाजी मंडई, माऊती रस्त्यांवरील किरकोळ विक्रेत्यांची तारांबळा उडाली. विशेषत: राखी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले असतानाच मंगळवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली. सकाळपासून उन्हाचा तडाखा होता. मात्र पावसाचे वातावरण नव्हते. पण, दुपारी मात्र वातावरण एकदमच बदलेले. पावसाने सुरवात केली. पावणे दोन ते दोन असा पंधरा मिनिटे मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यानंतर पाच मिनिटाच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा कोसळण्यास सुरवात केली. तब्बल सव्वा तसा पाऊस पडत होता.
यामुळे शहरातील अनेक रस्ते, चौक जलमय झाले. महापालिकेच्या दारातच पाण्याचा डोह निर्माण झाला. राजवाडा चौक, स्टेशन रोडवर पाण्याचा निचरा जलद गतीने झाला नाही. त्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी निर्माण झाली. आमराई चौकातही पाणी थांबून होते. शंभर फुटी रस्त्यांवरही सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाली होती. सिव्हील चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आदी ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांसह वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. गुंठेवारी परिसरातही पावसाने दैना उडवली. बहुतांशी विस्तारीत भाग चिखलमय झाला आहे.
किरकोळ विक्रेत्यांची तारांबळ
पावसाने अचानक हजेरी लावल्याने किरकोळ विक्रेते, हातगाडी चालकांची प्रचंड तारांबळा उडाली. येथील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईमध्ये पावसाचे पाणी घुसले. त्यामुळे भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले. माऊती चौक तसेच दत्त-माऊती रस्त्यांवर किरकोळ विक्रेते मोठ्या संख्येने बसतात. विशेषत: रक्षाबंधनच्या निमित्ताने राखी विक्रीचे स्टॉल मोठ्या प्रमाणात आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे राखी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले.








