पाटबंधारे विभागात मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाची स्थापना, वारणेत 11 तर कोयनेत 21 टी.एम.सी. पाणीसाठा
सांगली प्रतिनिधी
गुरूवारी सलग दुसऱया दिवशी सांगली मिरजेसह जिल्हय़ाच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला. सायंकाळनंतर अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली. सांगली, मिरजेसह शिराळा, वाळवा तालुक्याला वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाने झोडपले. दरम्यान पावसाळा आणि संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे विभागही सतर्क झाला असून मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
सांगली, मिरज शहरासह शिराळा, वाळवा, मिरज पश्चिम भागात चांगला पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत होता. तसेच ढगाळ वातावरण होते. उकाडय़ाने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. सांगलीत जवळपास दोन तास मुसळधार बरसल्या. त्यामुळे स्टेशन चौक, मारूती रोड, सह अनेक रस्ते जलमय होऊन वाहतूक विस्कळीत झाली होती. वीजपुरवठाही खंडीत झाला.
मिरज तालुक्यातील म्हैसाळसह परिसरातील नरवाड, ढवळी, वड्डी विजयनगर या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने दुसऱयांदा जोरदार हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहाच्या सुमारास जोरदार वादळी वाऱयासह पावसाने परिसराला झोडपून काढले. गेल्या 15 दिवसांपूर्वी पहिल्यांदा सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला होता. शिराळा तालुक्यात दुपारी तीन वाजता अचानक पूर्व दिशेने ढग दाटून आले. चारनंतर रेड, खेड, भटवाडी, बेलदारवाडी, करमाळे, कापरी, मांगले या भागात पावसाने सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱयांची तारांबळ उडाली. तालुक्याच्या उत्तर भागात जोरदार तर पश्चिम भागात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हा पाऊस धुळवाफ पेरणीतील भात पिकांच्या उगवणीला व भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकासाठी लाभदायक ठरणार आहे. पावसामुळे तालुक्यात काही भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाच्या पाण्याने नाल्यात कचरा अडकून राहिल्याने पाणी रस्त्यावर आले होते.
वाळवा तालुक्यातही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. इस्लामपूर, आष्टा, वाळवा, ताकारी परिसरात वादळी वारे, ढगांच्या गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण मुसळधार पावसाने भाजीपाला व फळबागासह अन्य पिकांचे नुकसान झाले. आष्टा शहरासह कारंदवाडी, मिरजवाडी, मर्दवाडी, फाळकेवाडी, नागाव, पोखर्णी, बावची, गोटखिंडी या भागातही जोरदार पाऊस पडला. पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यासह अन्य भागातही मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे.
पाटबंधारेत पूरनियंत्रण कक्ष कार्यरत
पावसाळा आणि महापुराच्या काळात कृष्णा खोऱयातील माहिती एकत्रित करून प्रशासन, प्रसारमाध्यमे यांना संबंधित यंत्रणामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी पाटबंधारे विभागाने पूर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. तर पूर नियंत्रण कक्ष अधिकारी म्हणून कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2301820/2302925, फॅक्स क्रमांक 0233-2302750, मोबाईल क्रमांक 9307862396 आहे. हा पूरनियंत्रण कक्ष 1 जून ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत चोवीस तास कार्यरत ठेवण्यात येणार असून अधिक माहितीसाठी पूरनियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती देवकर यांनी केले आहे.
वारणा धरणात 11.30 टीएमसी साठा
दरम्यान गुरूवारी सकाळी 8 वाजेपर्यंत वारणा धरणातील पाणीसाठा 11.30 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. आहे. याशिवाय 105.25 टीएमसी क्षमतेच्या कोयना 20.83 पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा आणि त्यांची क्षमता कंसात पुढीलप्रमाणे ः धोम 5.20 (13.50), कन्हेर 3.03 (10.10), दूधगंगा 8.02 (25.40), राधानगरी 2.81 (8.36), तुळशी 1.71 (3.47), कासारी 0.65 (2.77), पाटगांव 1.32 (3.72), धोम बलकवडी 0.75 (4.08), उरमोडी 5.42 (9.97), तारळी 2.51 (5.85), अलमट्टी 47.18 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेसमध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 2100, धोम 423, कण्हेर 24, वारणा 1540, दुधगंगा 1200, राधानगरी 450, तुळशी 200, कासारी 0.0, पाटगांव 0.0, धोम बलकवडी 0.0, उरमोडी 550, तारळी 180 व अलमट्टी धरणातून 624 क्युसेस विसर्ग सुरू आहे.