विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेतून गरीब, अशिक्षित, कष्टकरी बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास कामगार मंत्री तथा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे व्यक्त केला.
विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा या राज्यस्तरीय योजनेचा शुभारंभ व फिरत्या वैद्यकीय कक्षाचे लोकार्पण या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, महापालिका आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, एचएलएल लाईफ केअर कंपनीचे डीजीएम रणजीत एम., सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर आदि मान्यवर व्यासपाठीवर उपस्थित होते.









