अंगणातून ओढत नेऊन तोडले लचके, बालिका शासकीय रुग्णालयात दाखल
प्रतिनिधी/मिरज
शहरातील वेताळबा नगर येथे घरासमोरील अंगणात खेळत असणाऱ्या मुलीला ओढत नेऊन मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याचा सुमारास घडली. जैनब जुबेद इनामदार (वय ४) असे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालिकेचे नाव आहे. तिच्या अंगाला पाठीवर हातावर कुत्र्याने गंभीर स्वरूपात चावा घेतला असून, सदर बालिकेला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. चार वर्षाच्या बालिकेवर एकाच वेळी सात ते आठ कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडल्याने महापालिकेची कुत्री पकडण्याची मोहीम केवळ कागदावर असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
जैनैब जुबेद इनामदार ही मुलगी दुपारी साडेतीन वाजता आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. यावेळी सात ते आठ भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत तिला ओढत बाहेर नेले. यावेळी तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या आजोबांनी धाव घेत आरडाओरडा करत कुत्र्यांना हाकलले. मात्र कुत्र्यांनी बलिकेच्या हातावर, पायावर, पाठीत चावा घेऊन तिला जखमी केले होते. यावेळी जखमी बालिकेला मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
गेल्या अनेक दिवसांपासून मिरजेत भटक्या कुत्र्यांचे नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे मिरज शहर परिवर्तन समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.








