देवराष्ट्रे वार्ताहर
सभासदाच्या नावे परस्पर कर्ज काढून ती रक्कम बँकेतून बोगस सहीद्वारे काढुन अपहार केल्याप्रकरणी पाडळी सोसायटीचे चेअरमन आनंदा बाबा पवार रा. पाडळी, सचिव हणमंत सदाशिव मोहिते रा. मोहिते वडगाव , शिपाई सुरेश प्रताप यांच्याविरोधात शंकर शिवाजी चव्हाण यांनी चिंचणी- वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पाडळी ता.कडेगाव येथील शंकर चव्हाण हे त्यांच्या गाळपास गेलेल्या ऊसाचे बिल अद्याप का आले नाही म्हणुन गावातील सोसायटी कार्यालयात गेले. त्यावेळी त्यांचा पुतण्या गौरव चव्हाणच्या नावे एक लाख नव्वद हजारांचे कर्जे असुन त्यामुळे ऊस बिल थांबवल्याचे सोसायटीत सांगण्यात आले.त्यावेळी असे कोणतेही कर्ज आम्ही काढले नसुन त्याबाबतची कागदपत्रे दाखविण्याची विनंती चव्हाण यांनी केली. परंतु त्यांना कोणतीही कागदपत्रे दाखवण्यात आली नाहीत.
यावेळी चव्हाण यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चिंचणी शाखेतुन माहिती घेतली असता पुतण्या गौरवच्या खात्यात सदर रक्कम जमा होऊन लगेच काढण्यात आलेचे समजले. तसेच पैसे काढताना गौरव चव्हाण यांच्या खोट्या सह्या केल्याचे दिसुन आले.तसेच गौरव अज्ञान असतानाही त्याच्या पालकांच्या सह्याही नव्हत्या. याबाबत संबंधिताविरोधात कडेगाव दुय्यय निबंधकांकडेही तक्रार देण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्याने पाडळी सोसायटीचा कारभार चव्हाट्यावर आला असुन या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे करित आहेत.








