परवा एका दिवसात ४५ मिलिमीटर पाऊस पडला आहे
विटा : विटा शहरासह खानापूर तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यात तब्बल १६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. खानापूर तालुक्यातील पारे येथील तीर्थक्षेत्र दरगोबाच्या पायथ्याशी असणारा तलाव भरला असून सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यामुळे धबधबा तयार झाला आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दरगोबा डोंगराच्या पायथ्याला निसर्गप्रेमींची वर्दळ वाढली आहे.
दुसरीकडे तालुक्यातील बहुतांश तलाव भरून वाहू लागले आहेत. तर येरळा नदी देखिल दुथडी वाहत आहे. येरळेवरील वाझर बंधारा भरला असून कमळापूर-रामापूर पूल पाण्याखाली आहे. तालुक्यात गार्डी, माहुली, नागेवाडी, लेंगरे, वेजेगाव, भांबर्डे, देविखिंडी, भेंडवडे, भाळवणी, कार्वे, पारे, बाणूरगड, खानापूर, पळशी अशा सर्वच भागात मुसळधार पाऊस झाला आहे.
परवा एका दिवसात ४५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील ओढे, नाल्यांमधून पाणी वाहताना दिसत आहे. विहिरी, शेततळी, कूपनलिकांनाही चांगले पाणी आले आहे. शेतकरी खूश आहेत. द्राक्ष बागायतदार चिंतेत आहेत. मात्र इतर शेतकरी मशागतीसाठी ऊनाची वाट पहात आहेत. पारे तलावासह सर्वच तलावात पाणीसाठा वाढला आहे.
ऐन मे महिन्याच्या मध्यात तालुक्यातील पाणी साठवण तलाव भरल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. यावर्षी चांगला पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यावर्षी अधिकचा पाऊस पडणार, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते. त्याची झलक आतापासूनच दिसून येत आहे.
मान्सून महाराष्ट्रात दहा दिवस आधीच आला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मे च्या अखेरच्या आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याची गेल्या पंधरा-वीस वर्षातील ही पहिलीच घटना आहे. खानापूर तालुक्यात व विटा शहरात पडलेल्या गेल्या आठ ते दहा दिवसातील पावसामुळे ओढे, नाले वाहू लागले आहेत.
पारे तलाव भरून वाहू लागला आहे. सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे या ठिकाणी धबधब्याचे स्वरूप आले आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या दरगोबा तलावाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पावसाळी पर्यटकांचा ओढा वाढतो आहे. त्यामुळे पारे तलावाचा परिसर हळुहळू पर्यटकांनी फुलतो आहे.
तालुक्यातून वाहणारी येरळा नदी सततच्या पावसाने दुथडी वाहत आहे. तालुक्यातील वाझर बंधारा फुल झाला असून पाण्याची पातळी वाढू लागल्याने बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचे काम सुरू आहे. कमळापूर ते रामापूर हा येरळा नदीवरील पूल गेल्या तीन दिवसांपासून बंद असून पाणी पातळी वाढल्याने वाहतुक पर्यायी मार्गाने हलवण्यात आली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरीगेट्स लावून प्रवाशांना सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.








