जत, प्रतिनिधी
आभाळाकडे प्रचंड आस लावून बसललेल्या जत तालुक्याला रविवारी परतीच्या पावसाने रात्रभर संततधार करत खूप मोठा दिलासा देत, पुन्हा आशा जगवल्या. तालुक्यात एका रात्रीत ७३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यातील शेगाव परिसरात सर्वाधिक ९६.५ मिलीमीटर पाउस झाला. यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.
पावसाळा सुरु होऊन तीन महिने लोटले तरी तालुक्यात पाऊस झाला नाही. भयाण दुष्काळ स्तिती निर्माण झाली आहे. म्हैसाळ योजनेवर कसा तरी तालुका तग धरून आहे. पाण्याचे टँकर देखील सुरु आहेत. अशा सितीत रविवारी रात्री दमदार पावसाचे पुनरागमन झाले. जत तालुक्यात रात्रभर पावसाने चांगली सलामी दिली. यंदाच्या हंगामातील सर्वात मोठा व तालुक्याला दिलासादेणारा हा पाऊस ठरला आहे.
दरम्यान, जत तालुक्यातील ९ मंडळापैकी सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. तर सर्वाधिक पाउस शेगाव मंंडळामध्ये ९६.५ मिलीमीटर नोंदला गेला. तर संख ७१.८, माडग्याळ ७१.५, मुचंडी ८३.३, उमदी ८३, डफळापूर ८९.५ मिलीमीटर झाला. जत ५०, कुंभारी ५७.८ आणि तिकोंडीमध्ये ६१.३ मिलीमीटर पाउस झाल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीत नोंद झाले आहे.
या पावसाने तालुक्यातील बोरगी, शेगाव, संख, जत, रावलगुंडवाडी आदी भागात ओढे, नाले यांना यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पाणी वाहते झाले. शेतीचे बांध देखील भरले. खरीपातील काही पिकांना आधार झाला आहे. परतीच्या पावसाने अशीच अजून काही दिवस साथ दिल्यास किमान पुढील रब्बी हंगाम व दुष्काळ निवारण्यास चांगली मदत होऊ शकते. सोमवारी दिवसभर देखील तालुक्यात ढगाळ हवामान होते. काही भागात पावसाच्या तुरलक सरी बारसल्या. तर दिवसभर सुर्यदर्शन झाले नाही.








