ऍड बाबासाहेब मुळीक : खानापूर तालुका राष्ट्रवादीची मोहीम
सचिन भादुले विटा
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सध्या संक्रमणाच्या कालावधीमध्ये आहे. त्यातही सांगली जिल्हा खुद्द प्रदेशाध्यक्ष आणि शरदनिष्ठ जयंत पाटील यांचे होम ग्राउंड आहे. साहजिकच त्यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष लक्ष्य आहे. त्यामुळेच त्यांनी सांगलीची जबाबदारी स्वतः घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत निष्ठ राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी आता जुन्या जाणत्या साहेब निष्ठावंतांना साद घालण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या संघर्षाच्या काळात आम्ही खानापूर व आटपाडी तालुक्यातील राजारामबापू व खासदार शरद पवार साहेबांसोबत काम केलेल्या कार्यकर्त्याच्या कुटूबियांना भेटून त्यांना शरद पवार आणि जयंत पाटील यांची भूमिका समजावून सांगण्यासाठी कुटुंब भेटीचा कार्यक्रम सुरू करीत आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
खासदार शरद पवार यांच्याशी सांगली जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादी एकनिष्ठ राहिली आहे. मात्र खानापूर तालुक्यात युवा नेते वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ऍड बाबासाहेब मुळीक यांनी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटून भूमिका मांडली. याबाबतची माहीती ऍड. मुळीक यांनी विट्यात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसन जानकर, ऍड संदीप मुळीक उपस्थित होते.
ऍड बाबासाहेब मुळीक म्हणाले, खानापूर, आटपाडी तालुक्याशी लोकनेते राजारामबापू पाटील आणि खासदार शरद पवार यांचे गेल्या ५० वर्षांपासून घनिष्ट संबंध आहेत. राजकीय संघर्षाच्या काळात जनता पक्ष, समांतर काँग्रेस, समाजवादी काँग्रेस या पक्षांना या दोन तालुक्यांनी साथ दिली होती. १९७९ मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीत जनता पक्षाचे ५ पंचायत समिती सदस्य तर समांतर काँग्रेसचा एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक पंचायत समिती सदस्य निवडून आले होते. १९८० साली समाजवादी काँग्रेसचे लोकनेते हणमंतराव पाटील विधानसभेत निवडून आले होते. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हयात पक्षाने मोठी प्रगती केली. त्यावेळी खानापूर आटपाडीतून आमदार अनिलराव बाबर विधानसभेवर निवडून आले.
त्यांनतर २००२, २००७ व २०१२ साली खानापूर आटपाडी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत होऊन पंचायत समिती सभापती राष्ट्रवादी पक्षाचे झाले. २०१७ साली जिल्हा परिषद निवडणूकीत आटपाडी तालुक्यात १ पंचायत समिती सदस्य व खानापूर तालुक्यात १ पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले. विटा नगरपालिकेतही शरद पवार आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या विचाराच्या लोकांची बरेच वर्षे सत्ता होती. विटा शहरातील अनेक विकासकामांचा शुभारंभ शरद पवार साहेबांच्या हस्ते झालेला आहे.
गेल्या ३० ते ४० वर्षात अनेक कार्यकर्ते शरद पवार व राजारामबापू पाटील यांच्या सोबत होते. सध्याच्या संघर्षाच्या काळात आम्ही खानापूर व आटपाडी तालुक्यातील राजारामबापू व खासदार शरद पवार साहेबांसोबत काम केलेल्या कार्यकर्त्याच्या कुटूबियांना भेटून त्यांना शरद पवार आणि जयंत पाटील यांची भूमिका समजावून सांगण्यासाठी कुटुंब भेटीचा कार्यक्रम सुरू करीत आहोत, असे ऍड मुळीक यांनी सांगितले. यावेळी संतोष जाधव, तानाजी पाटील, संग्राम देशमुख, दिशांत धनवडे, सुवर्णा पाटील, सोनाली भगत, नानासाहेब मंडलिक, विशाल पाटील, हरिभाऊ माने, महेश फडतरे, निखिल गायकवाड, सुभाष शिंदे, सुरेश साळुंखे, गणेश कदम, मनोहर चव्हाण, निलप्रभा लोंढे उपस्थित होते.








