स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई, मुद्देमाल जप्त
सांगली : दिल्ली येथील सोन्याच्या दुकानात पोलीस असल्याची बतावणी करून सराफाकडून जबरी चोरी व कामगाराचे अपहरण करून 1 कोटी 56 लाखाचा ऐवज चोरून आणण्याची घटना घडली. या प्रकरणी मिरज तालुक्यातील दोघांना सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितामध्ये प्रशांत राजकुमार कदम (25, रा. उपळावी रोड, सोनी, ता. मिरज, जि. सांगली) आणि शुभम राजाराम कांबळे (26, रा. आरग, मुळ. बेघर वसाहत कळंबी, ता. मिरज, जि. सांगली) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक कोटी 40 लाखाचे सोने, चार लाख 29 हजाराची चांदी आणि 11 लाख 91 हजार रूपये रोख असा एकूण एक कोटी 56 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिल्ली येथील सराफ विक्रम कुबेरदारस काबुगडे यांचे दिल्लीतील फर्शबाजार पोलीस ठाण्याच्या परिसरात असणाऱ्या छोटा बाजार येथे भोला ज्वेलर्स नावाने दुकान आहे. याठिकाणी 15 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन अज्ञात इसम गेले. त्यांनी आपण पोलीस असल्याची बतावणी केली. त्यांनी जबरदस्तीने 1400 ग्रॅम वजनाचे सोने, रोख रक्कम आणि तीन किलो चांदी घेतली.
त्याठिकाणी असणाऱ्या कामगाराचे अपहरण करून निघुन गेले. याची माहिती तत्काळ सराफ विक्रम यांनी फर्शबाजार पोलीस ठाण्यात दिली. दिल्ली पोलिसांनी ही माहिती तत्काळ सर्व पोलीस ठाण्याकडे पाठविली. त्यानंतर तांत्रिक तपास सुरू करण्यात आला.
यामध्ये हे दोन अज्ञात इसम हे सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. त्यांनी सांगलीतील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला याची माहिती दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे यांनी याप्रकरणी एका पथकाची नियुक्ती केली.
या पथकाला या दोन संशयितांना शोधण्यासाठी पाठविले. हे दोघे सापडले पण त्यांनी पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे दिली. ताब्यात घेतल्यावर त्यांनी हा गुन्हा कबुल केला. यानंतर हा मुद्देमाल कोठे आहे याची माहिती घेवून त्यांनी हा मुद्देमाल ज्याठिकाणी लपविला होता.
तो या पोलीस पथकास दिला. दरम्यान त्यांनी ज्या कामगाराचे अपहरण केले होते. त्याचा ठावठिकाणा विचारला असता त्याला जयपूरला सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक कुमार पाटील, दिल्ली येथील पोलीस उपनिरिक्षक अमित चौधरी, सहाय्यक पोलीस फौजदार शशिकांत यादव, संदीप पाटील, अतुल माने, सुशील मस्के, श्रीधर बगडी, अभिजीत माळकर, सुनील मस्के यांनी केली.








