न्यायाधिश पांचोली यांचा निकाल : तीन वर्षे कैद, 21 हजार रुपये दंड : खंडणी स्वरुपात चार हजार ऊपये उखळले
इस्लामपूर प्रतिनिधी
येथील महाविद्यालयातील 20 वर्षीय विद्यार्थ्यावर जबरदस्तीने खंडणी स्वरुपात चार हजार रुपये घेवून अनैसर्गिक संबंध केल्या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यास प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हेमंत प्र.पांचोली यांनी 3 वर्षे कैद व 21 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ऑक्टोबर 2021 मध्ये या पोलीसाने हा कारनामा केला होता.
हणमंत देवकर (३७ ) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे नियुक्तीस होता. हा मुलगा एका उपनगरात खोलीमध्ये भाडयाने राहून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. दि.27 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास किर्लेस्करवाडी येथील मैत्रणीस भेटण्यास गेला होता. तिला भेटून तो रात्री 3 वाजण्याच्या सुमारास कॉलेजच्या गेटवर आला असता, रात्रगस्तीच्या दोन पोलीसांनी त्याला हटकले. त्याच्याकडून कुठून आलास, ही माहिती घेवून त्याचा मोबाईल नंबर देवकर याने घेतला.
त्यानंतर 29 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास देवकर याने त्याला फोन करुन कॉलेजच्या गेटवर बोलावून घेतले. त्याने प्रेम प्रकरणावरुन धमकावले. आणि पैशाची मागणी करुन न दिल्यास तुझ्या व मैत्रणीच्या घरात सांगणार, अशी धमकी दिली. या विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्याने मित्रांकडून 4 हजार रुपये जमा करुन ते देवकर याला दिले. तेवढयावर समाधान न झालेल्या देवकरने मैत्रणीच्या मोबाईल नंबरची मागणी करुन तिला माझ्याशी शारिरीक संबंध करण्यास सांग असे धमकावले. मात्र या विद्यार्थ्याने नकार दिला.
देवकर याने मैत्रणी सोबत सेक्स करायला देत नसतील, तर तुझ्या सोबत करणार अशी ही धमकी दिली. घाबरुन या विद्यार्थ्याने तयारी दाखवली. देवकर हा त्यास त्याच्याच रुमवर घेवून जावून त्याने या विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केले. दरम्यान त्याच्या मोबाईलमधून अश्लिल व्हिडिओ चित्रण केले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देवकर हा रुमवऊन निघून गेला. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी 11 ते 12 वाजण्याच्या दरम्यान देवकर याने या विद्यार्थ्यास गाठून व्हिडिओ चित्रण दाखवून पुन्हा अनैसर्गिक संबंधाची मागणी केली.
या विद्यार्थ्याने याची माहिती एका मित्रास दिली. त्यांनी पोलीस ठाण्यात देवकर याच्या विरुध्द तक्रार देण्यासाठी धाव घेतली. पोलीसांनी वर्दी घेवून गुन्हा दाखल केला. तपासानंतर आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. त्यावर न्यायाधिश पांचोली यांच्या समोर सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सहा.सरकारी अभियोक्ते भैरवी मोरे-गुळवणी यांनी काम पाहिले. या खटल्यात 18 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडीत मुलगा, त्याचे मित्र इतर साक्षीदारांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. या गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी केला होता. न्यायालयाने आरोपी देवकर यास दोषीधरुन तीन वर्षे कैद व 21 हजार ऊपये दंडाची शिक्षा सुनावली. यावेळी हवलदार संदीप शेटे यांचे सरकारी पक्षाला सहकार्य झाले.