मणेराजूरी, वार्ताहर
Manerajuri Crime News : मणेराजूरीतील हायस्कूलजवळील सदाशिव देवर्षी यांचे गुरुदेव एंटरप्रायझेस हे किराणा मालाचे दुकान चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री फोडले. यामध्ये रोख रकमेसह दुकानातील साहित्य असा सुमारे 50 ते 60 हजाराचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .
गेल्या सहा महिन्यात हे दुसऱ्यांदा दुकान फोडले असून, चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूने पत्रा उचकूटन दुकानात प्रवेश केला. दुकानातील रोख रक्कम, तेल,डाळी,महागड्या कॅटबेरी असा विविध माल चोरट्यांनी पळविला.पोलीसांचा पहिल्या चोरीचा तपास प्रलंबित असताना ही घटना पुन्हा घडली आहे. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरच पळवून नेला आहे.पहिली चोरी झाल्याने दुकानावर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.जानेवारीमध्ये झालेल्या चोरीचा तपास अजूनही रखडला असताना त्याच ठिकाणी दुसरी चोरी झाल्याने पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.








