प्रतिनिधी,विटा
Sangli Crime News : विक्रीच्या उद्देशाने 17 तलवारी घेऊन जाणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला विटा पोलिसांनी जेरबंद केले.संशयित आरोपी भगतसिंग विक्रमसिंग शिख (वय २१ वर्षे, रा. जुना कुपवाड रोड, नेहरुनगर सांगली) असे त्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी 9 जून रोजी रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशीपोलीस अधिक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधिक्षक तुषार पाटील,उपविभागीय पोलीस अधीकारी पद्मा कदम यांनी जिल्हाधिकारी सांगली यांच्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा स्थल सिमा हद्दीमध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) अन्वये शस्त्र बंदी आदेशाप्रमाणे शस्त्रे,सोटे,तलवारी,भाले,दंडे,बंदुका इ.इतर कोणतीही वस्तु बरोबर नेण्यास व बाळगण्यास मनाई करणारे आदेश पारीत केले आहेत.त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी विटा पोलिस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेमधील अंमलदार यांना सक्त पेट्रोलींग करुन वरील प्रमाणे गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचीत केले होते.
शुक्रवारी 9 जून रोजी रोजी विटा शहरात पेट्रोलिंग करत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील रोहित पाटील यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,तासगाव ते आळसंद बायपास रोडवर एक इसम तलवारी विक्री करणेकरीता येणार आहे.त्या ठिकाणी सापळा लावला असता थोड्यावेळानंतर एक इसम त्याचे ताब्यातील मोटारसायकल वरुन संशयितरित्या येताना दिसला.त्याचा पाठलाग करुन त्यास थांबवुन त्याचे सोबत असलेल्या साहित्याची झडती घेतली असता एका प्लॅस्टीकच्या पोत्यामध्ये १७ तलवारी सापडल्या.त्याच्याकडे सदरच्या तलवारींच्या बाबत चौकशी केली असता, त्याने सदरच्या तलवारी माझ्या असुन मी विक्रीसाठी घेवुन आलो आहे अशी कबुली दिली,असे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई राजेंद्र भिंगारदेवे,अमरसिंह सूर्यवंशी,शशिकांत माळी,महेश देशमुख,हणमंत लोहार,सुरेश भोसले,रोहित पाटील,अक्षय जगदाळे यांच्या पथकाने केली.संशयित आरोपी भगतसिंग शिख याला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने सदर आरोपीस १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे करीत आहेत.