वडिलांच्या खूनाचा बदला म्हणून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर
सांगली : सांगली येथील शंभरफुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात महेश प्रकाश कांबळे याचा दोघांनी धारदार शस्त्राने खून केला. मृत महेश याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. २०२१ मध्ये त्याने फिरोज उर्फ बडे शेरअली शेख (वय ४५, रा. जुना कुपवाड रस्ता, सांगली) याचा खून केला होता.
मृत फिरोजच्या मुलाने साथीदारासह महेशचा खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. वडिलांच्या खूनाचा बदला म्हणून हा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरीही या खूनाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
महेश कांबळे हा भाजी विक्रेता आहे. आर्थिक वादातून त्याने २०२१ मध्ये फिरोज शेख याचा खून केला होता. संजयनगर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होता. २०२३ मध्ये महेश हा जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो पुन्हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होता.
गुरूवारी सकाळी तो शंभर फुटी रस्त्यावरील होलसेल भाजी बाजारात गेला होता. त्यावेळी फिरोज याचा मुलगा व अन्य साथीदार त्याच्या मागावर होते. त्यांनी दुचाकी शोरूमजवळ महेशवर हल्ला चढवला. हल्ल्यात महेश गंभीर जखमी होऊन पडल्यानंतर हल्लेखोर पळाले. हल्ल्यानंतर भाजी बाजारात पळापळ झाली. सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय मोरे पथकासह धावले.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके पाठवली. प्राथमिक तपासात वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून फिरोज याने साथीदारासह खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतू त्याचबरोबर खून करण्यास अनैतिक संबंधाची किनार असल्याचे कारण पुढे येत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत.








