जत, प्रतिनिधी
जत तालुक्यातील सिंदुर येथे शेत जमिनीच्या शिवेच्या वादातून दोन गटात तुंबळ मारामारी झाली. यात गंगप्पा परप्पा मगदूम वय 33 याच्यावर दगडाने वर्मी घाव घातल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यास उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात दाखल केले असता तो मयत झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. याबाबत जत पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
याबाबत माहिती अशी की, सिंदूरपासून कांही अंतरावरील बसरगी सिंदूर रोडवरील मजगेनखोडी येथे मगदूम व देसारेट्टी यांची वस्ती आहे. त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा वाद आहे. वर्षभरापूर्वी या दोन गटात वादावादी झाली होती. हा वाद जत पोलिसांत आला होता. दोघांनाही समज देण्यात आली होती. मात्र त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.
दरम्यान, शुक्रवारी याच कारणावरून पुन्हा वाद उफाळून आला. दोन्ही कुटुंब आमने सामने आले. वादाचे पर्यावसन हानामारमारीत झाले. काठी दगडे घेऊन एकमेकांवर तुटून पडले. यात मगदूम कुटुंबातील गंगप्पा परप्पा मगदूम यांच्या डोकीत दगडाचा वर्मी घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तो मयत झाला.
याबाबत पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला. जमिनीच्या वादातून खुनाची घटना घडली असून लवकरच गुन्हा दाखल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जत पोलीस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.








