जत : प्रतिनिधी
जत शहरातील सातारा रोड परिसर नजीक राहणाऱ्या एका घराचा दरवाजा कटावणीने तोडून सुमारे पावणे तीन लाख किमतीचे सोने व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली . याबाबतची फिर्याद सचिन नागप्पा हत्ती यांनी जत पोलिसात दिली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन हत्ती व त्यांचे कुटुंबीय सातारा रोड परिसरात राहत आहे. त्यांचे दुमजली घर आहे. गुरुवारी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास सर्वजण बेडरूम मध्ये झोपी गेले. शुक्रवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरातील साहित्य विस्कटलेले दिसले. घराचा दरवाजा कडीकोयंडा कटावणी ने तोडलेला दिसून आला व कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी हत्ती कुटुंबीयांनी जत पोलिसात याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन चोरीस गेलेल्या त्याचा पंचनामा केला यामध्ये मंगळसूत्र, कर्णफुले, सोन्याच्या अंगठ्या, धातूचे नाणे, सोन्याच्या चैन, चांदीची भांडी व रोख रक्कम 40 हजार असा सुमारे पावणे तीन लाखाचा ऐवज चोरीस गेला आहे.









