उमदी पोलिसांकडून आरोपी जेरबंद
जत, प्रतिनिधी
कुणीकोनूर (ता.जत)येथील मायलेकीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पती बिराप्पा उर्फ बिरुदेव नाना बेळुंके यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. परंतु मायलेकीच्या खून प्रकरणात वेगळेच आरोपी पुढे आले आहेत. मायलेकीचा तिघा आरोपींनी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा खून करणी भानामतीच्या संशयावरून केल्याचे आरोपींनी कबुली दिली आहे. यामुळे या खून प्रकरणाला वेगळेच वळण मिळाल्याने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर उमदी पोलिसांचे या तपासाबद्दल कौतुक होत आहे.
मायलेकीचा खून केल्याप्रकरणी अक्षय रामदास बेळुंके (वय २३) विकास मारुती बेळुंके (वय२२) (रा.कोणीकोनूर) या दोघांना अटक केली आहे .या खून प्रकरणातील आणखी एक उमेश उर्फ बबल्या म्हाळाप्पा बेळुंके (वय.२०) हा आरोपी फरार झाला आहे .पोलिसांनी दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,कोणीकोनूर येथील बेळुंकेवस्ती येथे रविवारी (२३ एप्रिल) रोजी एका झोपडीत प्रिंयाका बिराप्पा बेळुंखे (वय .३२) व मोहिनी बिराप्पा बेळुंखे (वय.१४) या दोघींचा गळा आवळून खून केल्याचे आढळून आले होते. ही घटना रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती. यावेळी मयत प्रियंकाच्या नातेवाईकाच्या संशयावरून पतीने खून केल्याची तक्रार दिली होती त्यानुसार उमदी पोलिसांनी पती बिराप्पा बेळुंके याच्यावर गुन्हा दाखल करून केली होती.
दरम्यान, तपासात वेगवेगळे बारकावे तपासताना भावकीतीलच तिघांवर संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांची संशयाची सुई विकास बेळुंके व अक्षय बेळुंके यांच्यावर होती. पोलिसांच्या तपासांती ती अखेर खरी ठरली आहे. पोलिसांनी तातडीने दोघांना अटक करून कसून चौकशी केली असता दोघांनी करणी भानामतीच्या संशयावरून मायलेकीचा काटा काढला असल्याची स्पष्ट कबुली दिली आहे.
घटना घडली अशी, रविवारी दुपारी पाणी पिण्याच्या बहाण्याने मयत प्रियंका यांच्या घरी आरोपी विकास व अक्षय बेळुंके गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र बबल्या बेळुंके देखील होता. यावेळी प्रियंका हीस विकास यांनी पाणी मागितले आणि अचानकपणे तिचा गळा दाबून खून करण्यात आला. प्रियंकाची गळा दाबताना आरडा ओरड मुलगी मोहिनीने ऐकली यावेळी मुलगी आईला वाचवण्यास गेले असता तिचाही गळा दाबून आरोपीने तिची देखील हत्या करण्यात आली. शेजारच्या एका झोपडीत मृतदेह टाकण्यात आले. ज्यांनी या दोघींना मारले, त्यांच्या एका भावाचे महिन्याभरापूर्वी आजाराने निधन झाले होते, त्याच्यावर यांनीच भानामती केल्याचा संशय धरून आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तपास पंकज पवार करीत आहेत.








