विटा,प्रतिनिधी
प्रेम संबंधातून आईच्या संगनमताने प्रियकराने सहा वर्षाच्या चिमुरड्या लेकराचा खून केल्याची घटना खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे उघडकीस आली आहे. मुलाच्या अपहरणाचा बनाव करून विहरीत ढकलून त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शौर्य प्रकाश लोंढे (वय-६) असे दुर्दैवी चिमुरड्याचे नाव आहे. या खळबळजनक घटनेने खानापूर तालुका हादरला आहे. या प्रकरणी ज्योती प्रकाश लोंढे (वय- 28) आणि तिचा जोंधळखिंडी येथील प्रियकर संशयित रुपेश नामदेव घाडगे (वय- 25) यांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. विटा पोलिसांनी अवघ्या 3 दिवसात हा प्रकार उघडकीस आणला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लेंगरे येथील ज्योती लोंढे या विवाहितेने जोंधळखिंडी येथील संशयित रुपेश घाडगे या प्रियकरासोबत संगनमताने कट रचून आपल्या पोटच्या लेकराचाच काटा काढल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ज्योती आणि रुपेश घाडगे यांना लग्न करायचे होते. परंतु, ज्योतीचा सहा वर्षीय मुलगा शौर्य प्रकाश लोंढे याच्यामुळे या दोघांना अडचण होत होती. त्यामुळे या दोघांनी आपली अडचण दूर करण्यासाठी कारस्थान रचून शौर्य लोंढे याचा अपहरण झाल्याचा बनाव केला. शनिवारी दुपारपासून लेंगरे गावात शौर्य लोंढे हरवला असल्याबाबत समाज माध्यमातून संदेश फिरत होता. अखेरीस त्याचा मृतदेह ढोराळे रस्त्यावरील एका विहिरीत आढळून आला. पोलिसांनी शिताफीने चौकशी करून हा प्रकार उघडकीस आणला. या घटनेने लेंगरे सह परिसरात खळबळ माजली आहे.
Previous Articleशेतकऱ्यांच्या हितासाठी चौगुले यांना विजयी करा
Next Article शहरासह उपनगरांना वळिवाने दिला दिलासा









