एकीचा दुर्दैवी मृत्यू…तर एकीला वाचविण्यात यश… भिलवडी परिसरात हळहळ
भिलवडी प्रतिनिधी
भिलवडी, साठेनगर येथील दोन लहान शाळकरी मुली घरा शेजारील काही लहान मुलांसह पोहायला गेल्या असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यामध्ये बुडाल्या.यामधील एका मुलीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला तर स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे एकीला वाचविण्यात यश आले आहे.
भिलवडी येथे घडलेल्या या दुर्दैवी घटनेची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,भिलवडी ता. पलूस येथील साठे नगर येथील मल्हारी शंकर मोरे यांच्या देवयानी व चांदणी या दोन सख्ख्या बहिणी आपल्या घराजवळील काही लहान मुलांसह साखरवाडी येथील पाणवठ्यावर पोहायला गेल्या होत्या. कृष्णानदी पात्राच्या कडेलाच पोहणाऱ्या या शाळकरी मुली नदी पाण्यापासून थोड्या आत पोहत होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघीही पाण्यामध्ये बुडाल्या. यावेळी या ठिकाणी धुणे धुण्यासाठी आलेल्या एका महिलेने प्रसंगावधान राखीत आरडाओरडा केला.त्यानंतर तेथून काही अंतरावर मच्छेमारी करणाऱ्या अजिज फकीर यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन चांदणी मल्हारी मोरे अंदाजे वय वर्षे ११ या एका मुलीस बाहेर काढले. तर दुसरी मुलगी देवयानी मल्हारी मोरे अंदाजे वय वर्षे १० ही पाण्यामध्ये बुडाली. महिलेने केलेल्या आरडाओरड्यामुळे परिसरातील लोक मोठ्या संख्येने जमा झाले.साखरवाडी, पंचशील नगर, साठे नगर येथील युवकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करीत बुडालेल्या मुलीस बेशुद्धावस्थेत पाण्यातून बाहेर काढले व तात्काळ उपचारासाठी सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु उपचारापूर्वीच सदर मुलगी मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संबंधित मुलींचे वडील मल्हारी शंकर मोरे यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याने या मुलींचे पितृ छत्र हरपले होते.त्यामुळे आज घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे भिलवडी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देवयानीच्या शरिराचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह आईने फोडलेला हंबरडा उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता.