तलवार आणि कोयता जप्त, स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
मिरज प्रतिनिधी
तालुक्यातील बेडग येथे धारदार हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास मिरज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. अविनाश कुमार भोरे (वय २६, रा. टेलीफोन ऑफिसजवळ, बेडग) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून तलवार आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली.
मिरज गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना गोपनीय खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार बेडग येथे टेलिफोन ऑफिस जवळ एक तरुण धारदार हत्यार घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेडग गावात धाव घेतली. अविनाश मोरे या तरुणाला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक तलवार आणि कोयता मिळून आला. सदर हत्यारा बाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता दहशत माजवण्यासाठी तो हत्यारे घेऊन फिरत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून तलवार आणि कोणता जप्त केलाय. याबाबत त्याच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









