वार्ताहर बेडग
बेडग (ता. मिरज) येथे आंदोलनकर्त्या मराठा समाजातील तरुणांनी जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांचा ताफा अडवला. जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देऊन मराठा आरक्षण तातडीने द्यावे, अशी मागणी करण्यात आली. आंदोलन स्थळावर थांबून निवेदन स्वीकारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार दिला होता. मात्र मराठा तरुणांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे वातावरण तणाग्रस्त बनल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी बेडग गावातील म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीन येथे जिल्हाधिकारी भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी सोबत जलसंपदा विभागातील काही अधिकारी होते. म्हैसाळ योजनेकडे जाणाऱ्या रस्त्याकडेलाच मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू होते. यातील तीन तरुण आमरण उपोषण करीत होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून पुढे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी रस्त्यावरच ठिय्या मारला.
म्हैसाळ टप्पा क्रमांक- ३ ची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांचा ताफा परत येत असताना मराठा समाजातील तरुणांनी त्यांच्या गाड्या अडवल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गाडीतून उतरून आंदोलकांचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला.
त्यामुळे मराठा समाजातील तरुण आक्रमक झाले. एक मराठा लाख मराठासह शासन आणि प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. मराठा समाजाला तातडीने कायमचे आरक्षण द्यावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.









